चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात (History of Brahmapuri Constiruency) कधीही एका पक्षाचं वर्चस्व राहिलं नाही. काँग्रेस, भाजप, शिवसेना, जनता दल, अशा प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला येथील मतदारांनी संधी दिली. इतकंच काय पण अपक्ष उमेदवारांना देखील या मतदारांनी स्वीकारलं. मात्र, या मतदारसंघाचं एक वेगळेपण (Constituency where ruling party loose) देखील आहे. मागील 40 वर्षांपासून या मतदारसंघात ज्या पक्षाचा उमेदवार जिंकला आहे, ते सत्ताधारी होऊ शकलेले नाही. याउलट असंही म्हणता येईल की जे राज्यात सत्तेवर राहिले आहेत, त्यांना या मतदारसंघात यश मिळालेलं नाही.
साधारण 1962 मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाला. त्यावेळी काँग्रेस उमेदवार गोविंद मेश्रम यांनी येथून विजय मिळवला. त्यानंतर हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गात आला. तेव्हापासून म्हणजे 1962 ते 1978 या काळात या मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा पाहायला मिळाला. 1967 आणि 1972 मध्ये काँग्रेसचे उमेदवार बलीराम गुरपुडे यांनी येथून विजय मिळवला.
यानंतर काँग्रेसचे उमेदवार बाबूराव भेंडारकर यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मारोतराव कांबळे यांना पराभूत केलं. मात्र, या विजयानंतर काँग्रेसच्या लोकप्रियतेला ओहटी लागली आणि ती कमीकमी होत गेली. त्यानंतर 1980 मध्ये या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार बाबासाहेब खानोरकर यांनी काँग्रेसचे उमेदवार अब्दुल धमानी यांचा पराभव केला. तेव्हापासूनच सत्ताविरोधी जनमताच्या या परंपरेला सुरुवात झाली.
1985 मध्ये बाबासाहेब खानोरकर यांनी काँग्रेस (समाजवादी) पक्षाकडून निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार श्रीराम भोयर यांना पराभूत केलं. 1990 मध्ये शिवसेनेचे उमेदवार नामदेव दोनाडक यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शांताराम पोटदुखे यांना पराभूत केलं.
1995 मध्ये जनता दलाचे उमेदवार बाबासाहेब खानोरकर यांनी भाजपच्या वासुदेवराव पाथोडे यांचा पराभव केला. 1999 मध्ये भाजपचे उमेदवार उद्धवराव शिंगाडे यांनी बाजी मारली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अशोक भय्या यांनी 25,200 मतं घेतली. त्याचा फटका रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मारुतीराव कांबळे यांना बसला आणि ते पराभूत झाले.
2004 मध्ये भाजपचे अतुल देशकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दामोदर मिसार यांचा पराभव केला. 2009 मध्ये देशकर यांनी मजबूत अपक्ष उमेदवार संदीप गड्डमवार यांना मात दिली. मात्र, 2014 मध्ये राज्यासह देशभरात भाजपला घवघवीत यश मिळालेलं असताना या मतदारसंघात मात्र, अपयशाचा सामना करावा लागला. अतुल देशकर तिसऱ्यांदा निवडून येण्याचं स्वप्न पाहत असताना चिमूर विधानसभा मतदारसंघ सोडून पहिल्यांदाच ब्रम्हपुरीतून लढणाऱ्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी त्यांना पराभूत केलं.
यावेळच्या (2019) विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे उमेदवार संदीप गड्डमवार यांना पराभवाची धूळ चारत विजय मिळवला. विजय वडेट्टीवार 18550 मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांना 96727 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या संदीप गड्डमवार यांना 78177 मतं मिळाली. या मतदारसंघात असलेल्या अन्य उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी न्यायाधीश चंदूलाल मेश्राम, आम आदमी पक्षाकडून परोमिता गोस्वामी, संभाजी ब्रिगेडकडून जगदीश पिलारे, कम्युनिस्ट पक्षाकडून विनोद झोडगे हेही निवडणूक मैदानात होते.
सध्यातरी राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तास्थापन करेल असं स्पष्ट दिसत आहे. असं असलं तरी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊन काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी मतदारसंघाची परंपरा यावेळीही राखली जाणार की नाही हे येणाऱ्या काळात कोण सत्तास्थापन करणार यावरच ठरेल.