नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदावर (Congress President) सर्वाधिक काळ राहिलेल्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडेच पुन्हा एकदा सूत्र सोपवण्यात आली आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोनिया गांधींकडे सोपवण्यात आली असली, तरी पुन्हा एकदा गांधी घराण्याकडेच अध्यक्षपद गेल्याचं दिसत आहे. गेल्या चार दशकांत गांधी घराण्यातील चार सदस्यांनी काँग्रेस अध्यक्षपद भूषवलं आहे.
1978 ते 2019 या 41 वर्षांच्या कालावधीत काँग्रेसला सहा अध्यक्ष मिळाले. 1992 ते 1998 हा सहा वर्षांचा काळ वगळला, तर अध्यक्षपदावर गांधी घराण्यातील सदस्यांची मक्तेदारी दिसते. 1978 ते 1984 ही सहा वर्ष तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. यापूर्वी 1959 मध्येही इंदिरा गांधी यांच्याकडे काँग्रेसचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस अध्यक्षपदाची माळ त्यांचे पुत्र राजीव गांधी यांच्या गळ्यात पडली. राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रंही त्याच वेळी हाती घेतली होती.
1991 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपद गांधी घराण्याबाहेर गेलं. पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या पी व्ही नरसिम्हा राव यांच्याकडे पुढील पाच वर्षांसाठी (1991-1996) अध्यक्षपद सोपवण्यात आलं. पी व्ही नरसिम्हा राव पायउतार झाल्यानंतर दोन वर्षांसाठी (1996-1998) सीताराम केसरी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.
1998 साली खांदेपालट करण्यात आलं आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपद सोपवण्यात आलं. आतापर्यंत पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीकडेच काँग्रेस अध्यक्षपद ठेवण्यात आलं होतं. मात्र भारतीय वंशाच्या नसलेल्या सोनिया गांधी यांच्याऐवजी 2004 मध्ये डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधानपदी विराजमान झाले.
1998 ते 2017 अशी 19 वर्ष सोनिया गांधींकडे काँग्रेसचं नेतृत्व होतं. काँग्रेसच्या इतिहासात त्या सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवणाऱ्या नेत्या ठरल्या. युवा नेतृत्वाला संधी देण्यासाठी 2017 मध्ये राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपद सोपवण्यात आलं. मात्र 2019 मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी 3 जुलै 2019 रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर चाळीस दिवसांनी काँग्रेसला हंगामी अध्यक्ष मिळाला.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी कुटुंबाकडेच राहावे, अशी मागणी झाली. राहुल गांधींनी मात्र गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष निवडण्यावर भर दिला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र, राहुल गांधी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले.
अखिल भारतीय काँग्रेसची सर्वसाधारण निवडणूक घेऊन अध्यक्षांची निवड होईपर्यंत सोनिया गांधींना अंतरिम अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. सोनिया गांधींनी ही विनंती मान्य करत अंतरिम अध्यक्षपद स्वीकारले, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.