राहुल गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेते योगेश सोमणांवर कारवाईचा गृहमंत्र्यांचा इशारा

| Updated on: Jan 16, 2020 | 4:03 PM

योगेश सोमण यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे, पण लवकरच कारवाई केली जाईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

राहुल गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेते योगेश सोमणांवर कारवाईचा गृहमंत्र्यांचा इशारा
Follow us on

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे अभिनेते आणि मुंबई विद्यापीठाच्या ‘थिएटर ऑफ आर्ट्स’चे संचालक योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमणांवर कारवाई करण्याचा इशारा (Home Minister on Yogesh Soman) दिला आहे.

मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक योगेश सोमण यांनी राहुल गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. प्राध्यापकाचं काम मुलांना शिकवणं आहे, अशाप्रकारची वक्तव्य करणं नाही. त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे, पण लवकरच कारवाई केली जाईल, असं अनिल देशमुख यांनी ‘एएनआय’ला सांगितलं.

योगेश सोमण यांनी 14 डिसेंबरला फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. राहुल गांधीनी वीर सावरकरांवर टीका केल्यानंतर त्याला प्रत्युत्तरादाखल सोमणांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत त्यांनी राहुल गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती.

योगेश सोमण यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ

या व्हिडिओच्या निषेधार्थ सोमण यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी ‘एनएसयूआय’ या विद्यार्थी संघटनेने केली होती.

मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन केले. अननुभवी शिक्षक, अर्धवट शिकवून अभ्यासक्रम पूर्ण केल्याची घोषणा, नाट्यशास्त्र विभागातील गैरसोयी अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. यानंतर सोमवारी रात्री उशिरा योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. त्यामुळे या कारवाईला राहुल गांधींवरील व्हिडीओ आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी अशी दुहेरी पार्श्वभूमी आहे.

मुंबई विद्यापीठाने या सर्व प्रकरणासाठी सत्यशोधक समिती नेमली आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई होईपर्यंत सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. चार आठवड्यात या प्रकरणाचा निकाल लागणे अपेक्षित (Home Minister on Yogesh Soman) आहे.