बुलडाणा : कोरोना काळात 14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? असा खडा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. कोरोना काळात मुख्यमंत्री 14 महिने मंत्रालयात आले नाहीत. मात्र तरीही त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री कसे म्हणता? असं बावनकुळे म्हणाले. बुलडाण्यात पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरेंना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणाणारा सर्व्हे कुणी केला माहिती नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी विकासाची कामे केली, असा दावा बावनकुळे यांनी केला. त्यामुळे राज्यातील 12 कोटी जनतेला विचारा, उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण आहे, असं बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. आता तुम्ही मातोश्रीला घरी बसलेले आहेत, कायम घरीच बसा, असा हल्लाबोल राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.
हे सरकार आहे तरी कुठे, जनतेने या राज्यात भाजपचं सरकार यावं, मुंबई महापालिका आम्ही जिंकावी, मुंबई जगातील सुंदर, पर्यटन, आरोग्यदायी शहर बनवण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये आहे, अशी जनतेची भावना आहे. शिवसेनेचा आशिर्वाद आम्हाला नको, महागात पडेल, त्यांचा रोखीचा आशिर्वाद असतो, अशी खिल्ली नारायण राणे यांनी उडवली.
मागील महिन्यात प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल जाहीर केला होता. त्यात देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले. प्रश्नमकडून देशातील 13 राज्ये निवडण्यात आली होती. त्यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. या 13 राज्यांमध्ये देशातील एकूण लोकसंख्येच्या 67 टक्के लोक राहतात. या सर्वेक्षणात नुकत्यात विधानसभा निवडणुका पार पडलेल्या तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसामचा समावेश नाही. तर आंध्र प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पॅनेल नसल्यामुळे या राज्यांचाही सर्वेक्षणात समावेश करता आला नसल्याचं सांगितण्यात आलं आहे.
या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे.
संबंधित बातम्या
Uddhav Thackeray : देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेच नंबर वन!