अमरावती : सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र बीएमसी (BMC) त्यांचा राजीनामा स्विकारत नसल्यानं त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाहीये. त्यांनी आता या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांना खरच ऋतुजा लटके यांना उमेदवारी द्यायची आहे की? त्यांच्या जागी दुसरा एखादा उमेदवार उभा करून त्यांच्या सहानुभूतीचा फायदा घ्यायला आहे? हे आधी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावं असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, कायदा सर्वांना समान आहे. त्यामुळे लटके यांचा जो काय निर्णय होईल तो कायद्याने होईल. देशात कायद्याचं राज्य आहे. संयम ठेवा, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस आहे. उद्या सर्व चित्र स्पष्ट होईल असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांना जर लटके कुटुंबाविषयी एवढीच सहानभुती होती तर त्यांनी स्पष्ट करावं की ते रमेश लटके यांना कितीवेळा भेटले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री, आणि पक्षप्रमुख झाल्यानंतर त्यांनी रमेश लटके यांना वेळ दिला का? त्यांना किती वेळ मातोश्रीबाहेर उभे राहावे लागेल असा खोचक सवाल देखील नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. ते अमरावतीमध्ये बोलते होते.