मुंबई | 1 मार्च 2024 : लोकसभा निवडणुका कधीही लागण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात तर गेल्या दोन वर्षात राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. पूर्वी राज्यात चार प्रमुख पक्ष होते. आता सहा झाले आहेत. मात्र हे सहाही पक्ष युती आणि आघाडीत विभागल्या गेले आहेत. यावेळची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. त्यातही शरद पवार गटाविरुद्ध अजित पवार गट असाही सामना रंगणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत शरद पवार यांना अजित पवार यांचं किती आव्हान असेल? याबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच मोठी माहिती दिली आहे.
टीव्ही9 मराठीच्या लोकसभेचा महासंग्राममध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आमच्यासमोर फुटून गेलेल्यांचं आव्हान नाहीच आहे. आमच्यासमोर भाजपचं आव्हान आहे. आमची लढाई भाजपसोबत आहे. राज्यातील बहुसंख्य मतदार हा शरद पवार यांच्या बाजूने आहे. जे फुटून गेले, त्यांच्यामुळे फक्त काही टक्के मते आमची गेली. पण फार फरक पडत नाही. त्यामुळे आता आम्ही 35 टक्के मतदान असणाऱ्यांवर बोलायचं की चार टक्के मतदान असणाऱ्यांवर हे तुम्हीच सांगा, असं जयंत पाटील म्हणाले.
अजित पवार आणि त्यांचे सहकारी पक्षातून का गेले यावरही त्यांनी भाष्य केलं. आम्हाला तिकडे जावं लागेल असं या लोकांनी दीड महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं. तसा आग्रह त्यांनी धरला होता. त्यांच्या काही अडचणी होत्या. त्यामुळे त्यांना त्या अडचणी सोडवण्यासाठी हाच मार्ग योग्य वाटत होता. त्यांच्यातील आठ दहा जणांना जावं वाटत होतं. त्यांनी आमदारांकडून सह्या घेतल्या. हे सुरुवातीला झालं. त्यांनी आमदारांना एकत्र केलं आणि सह्या घेतल्या असं नाही. त्यांच्या अडचणई काय होत्या हे माहीत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमदारांचा भाजपसोबत जाण्याचा अट्टास नव्हता. तुम्ही ठरवाल ते करू असं आमदार म्हणायचे.
भाजपसोबत जाण्याची शरद पवार यांनी 2014मद्ये भूमिका घेतली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. 2014 मध्ये शरद पवार यांनी भूमिका घेतली होती. पण पाठिंबा दिला नाही. त्यानंतर संदिग्धता तयार झाली आणि त्यानंतर पाच वर्ष दोन्ही पक्षाचे जुळले नाही. त्यानंतर काय झालं हे पाहिलंच आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांनी ज्या काही भूमिका घेतल्या. त्या सर्व पक्ष रिलेव्हंट ठेवण्यासाठीच, असा दावाही त्यांनी केला.
सुप्रिया सुळे यांनी गेल्या दहा वर्षात सर्वात चांगली कामगिरी केली. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. दशकातील बेस्ट परफॉर्मर म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी संपूर्ण बारामती पिंजून काढला आहे. वडिलांचं नाव आहे, भाऊ पाठी आहे म्हणून त्या गाफिल राहिल्या नाहीत. त्या काम करत गेल्या, असंही ते म्हणाले.