चंद्रपूर : महाराष्ट्रात मुंबईपासून सुमारे 1 हजार किमीचा प्रवास केल्यानंतर काँग्रेसचा खासदार दिसेल असे गंमतीने म्हटले जात आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरचे दिग्गज भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना आव्हान देत काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. याच वेळेस शिवसेना नेतृत्वाने 48 लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे राहण्याच्या दृष्टीने आदेश दिले होते. चंद्रपूर अर्थात याला अपवाद नव्हता. आमदार बाळू धानोरकर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वरोरा विधानसभेचे शिवसेना आमदार होते. लोकसभा लढवा असा आदेश ‘मातोश्री’ने दिल्यावर त्यांनी या मतदारसंघात शिवसेनेच्या संघटनात्मक प्रमुखाची जबाबदारी चातुर्याने स्वतःकडे घेतली. इथूनच धानोरकर यांच्या खासदारकीच्या आशा पल्लवित झाल्या.
गेली साडेचारवर्षे शिवसेना सत्तेत असून केंद्र-राज्य सरकारविरोधात आंदोलनाची मालिका राबवत होती. या आंदोलनाच्या निमित्ताने बाळू धानोरकर यांची विधानसभानिहाय संघटन-ओबीसी समाज-अर्थकारणांची बांधणी केली. ही आंदोलने सुरु असताना स्थानिक खासदार हंसराज अहिर यांना मंत्रिपदामुळे मोठा काळ दिल्लीत घालवावा लागत होता. संघटनेत -रस्त्यावरील संघर्षात अनेक वर्ष घालविल्याने धानोरकर यांना अहिर यांची ही अडचण चांगलीच लक्षात आली.
वंचितचा फटका
हा मतदारसंघ कुणबी बहुल आहे. मात्र एकाही राष्ट्रीय पक्षाने आजवर कुणबी चेहे-याला उमेदवारी दिली नव्हती. धानोरकर यांच्या समर्थकांनी पर्याय क्र. 2 ची तयारी सुरु केली. भाजप-सेना युतीच्या भावना अनावर झाल्यास काँग्रेसकडे तिकीट मागण्यासाठी राहुल गांधींपर्यंत फिल्डिंग लावली गेली. अपेक्षेनुसार युतीची घोषणा झाली. आपले 4 वर्षांचे परिश्रम मातीमोल होणार असे दिसत असतानाच काँग्रेस विधीमंडळ गट उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी धानोरकरांना दिल्ली दाखवली. त्यांनी CWC सदस्यांना धानोरकर कसे विनिंग कँडिडेट आहेत याची जाणीव करुन दिली.
बाळू धानोरकर यांचा मद्यविक्रीचा व्यवसाय आणि चंद्रपुरात असलेली दारूबंदी उमेदवारीच्या आड आली. काँग्रेसच्या यादीत धानोरकरांना तिकीट नाकारले गेले. मोठा गदारोळ झाला. धानोरकर-वडेट्टीवार-अशोक चव्हाण त्रिकूट मल्लिकार्जुन खरगे यांच्या दारी पोहोचले. तोवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रपूरची जागा राष्ट्रवादीला द्या असा निरोप राहुल गांधींना दिला होता.
शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकरांनी काँग्रेसची लाज राखली!
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कुणबी-ओबीसी-दलित-मुस्लिम मतांची जुळवाजुळव झाली होतीच. शिवसेनेची संपूर्ण संघटना काँग्रेससाठीच राबविण्याची वेळ आली होती. अखेर तिकीट मिळाली. विशेष म्हणजे या भागात चंद्रपूर-बल्लारपूर-राजुरा या विधानसभा मतदारसंघात ‘माळी’ समाज भाजपचा मतदार होता. वंचित बहुजन आघाडीने माळी उमेदवार दिला आणि माळी मते गठ्ठ्याने वंचितकडे गेली. भाजपची हक्काची मते वंचितने खाल्ली.
भाजपच्या अंतर्गत गोटात 5 वर्षे अहिर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेली अहंकारी वागणुकीची चर्चा नकारात्मक वाटेवर गेली. प्रचाराच्या प्रमुख दिवसात भाजप कार्यकर्ते दिसेनासे झाले. अहिर यांची यंत्रणा सोशल मीडियावर सपशेल नापास झाली. अहिर-मुनगंटीवार यांच्यातील विसंवादाने यावर कळस केला. 23 मे रोजी जेव्हा निकाल प्रक्रिया सुरु होती तेव्हा बाळू धानोरकर यांनी पहिल्या 2 फेऱ्या वगळता 28 फेऱ्यात छोटी मात्र निर्विवाद आघाडी कायम ठेवली. अखेर सुमारे 44 हजार 763 मतांनी बाळू धानोरकर यांनी विजय मिळविला.
दारुबंदी अवघड जागेचे दुखणे
या निवडणुकीच्या प्रचारात आणि त्याआधी देखील चंद्रपूर जिल्ह्यात लागू झालेली दारूबंदी भाजपच्या दृष्टीने ”अवघड जागेचे दुखणे’ ठरली आहे. या बंदीनंतरदेखील कोट्यवधी रुपयाची दारु चोरट्या मार्गाने जिल्ह्यात येत आहे. त्यात ती महाग आणि बनावट देखील आहे. पोलिसांच्या मोहिमांत हजारो सामान्य नागरिक अकारण गुन्हेगार होत आहेत. चक अवैध दारू विक्रेते मालामाल होत आहेत. पोलीस विविध मार्गांनी येणारी दारू रोखण्यात हतबल ठरले आहेत. या दारु प्रकरणातील चीड देखील भाजपच्या पराभवाचे एक कारण आहे.
ज्या लोकसभा क्षेत्रात नगर पंचायत , नगर परिषदा , जिल्हा परिषद , मनपा , 5 आमदार, राज्याचे अर्थमंत्री, आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री भाजपचे आहेत तिथे काँग्रेसने जातीय समीकरण आणि सत्ताधाऱ्यांची गाफील यंत्रणा या जोरावर धडाकेबाज विजय मिळविला. 6 विधानसभात बाळू धानोरकर यांना मिळालेल्या मतांच्या आघाडीचा विचार केला तर वणी आणि आर्णी या विधानसभा क्षेत्रात भाजपला बंपर मताधिक्य आहे. मात्र वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा या विधानसभात धानोरकरांना प्रचंड मताधिक्य मिळाले.
यापैकी राज्याचे अर्थमंत्री आणि बल्लारपूर विधानसभेचे आमदार असलेले दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या क्षेत्रात काँग्रेसला मिळालेले 30 हजारांचे मताधिक्य आश्चर्यचकित करणारे आहे. पुढच्या 4 महिन्यात विधानसभेचा आखाडा रंगणार आहे. मताधिक्य मिळालेल्या आणि पिछाडीवर असलेल्या सर्वच विधानसभा जागांवर काँग्रेसला विजयी करण्याचे खा. धानोरकर यांचे लक्ष्य असेल. ‘विधानसभा निवडणुकीचा साधारण विचार केला तर भाजपसाठी चंद्रपूर लोकसभेचा निकाल धोक्याची महाघंटा आहे.
संबंधित बातम्या
शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकरांनी काँग्रेसची लाज राखली!
लोकसभा निकाल : तुमच्या मतदारसंघाचा निकाल इथे पाहा!
महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकरांशी बातचीत