मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुंबई हे केंद्रशासित प्रदेश होणार हा विरोधकांचा जावईशोध असल्याचं शिंदे म्हणाले. आम्ही गुवाहाटीला होतो. तेव्हा काही लोकं म्हणाले, यायचं तर वरळीत येऊन दाखवा. एकनाथ शिंदे एकटा आला. हेलिकॅप्टरनं न जात या रोडनं एकटाचं गेला. आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो आहे. आम्हाला काही आयतं मिळालेलं नाही, अशी टीकाही त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही शाखाप्रमुख झालो. धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालो. कुणालाही तुम्ही आव्हानं देता. आम्ही आव्हानं पेलत पेललं इथंपर्यंत आलोत.
काही लोकं सकाळी उठले की, गद्दार खोके येवढ दोनच शब्द बोलतात. तिसरा शब्दच काढत नाही. एकनाथ शिंदे अशी छोटी आव्हान स्वीकारत नाही. मोठी आव्हानं स्वीकारतो. ते आव्हान सहा महिन्यांपूर्वी स्वीकारलं.
भाजप-शिवसेना युती म्हणून लोकांनी निवडून दिलं होतं. पण, निकाल लागताच काही लोकं म्हणाले आम्हाला सर्व दरवाजे उघडे आहेत. २०१९ ला व्हायला पाहिजे होतं त्याची दुरुस्ती आम्ही केल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.
काही लोकं इकडं उभा राहा तिकडं उभा राहा असं सांगतात. आमच्या नरेश म्हस्के यांनी सांगितलं. तुम्ही महापालिकेच्या वॉर्डात उभे राहा. असं आव्हानचं त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं. आम्ही रात्रंदिवस काम करतो. सामान्यांना न्याय देण्याचं काम करतो. आणखी जेकाही काम आहेत ते करू.
मुंबईकरांना दर पावसाळ्यात खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत होता. सरकार आल्यानंतर खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. साडेसहा हजार कोटी रुपयांचे क्रांक्रीटचे रस्ते करतोय.
कोळीवाडा हे मुंबईचं वैभव आहे. कोळी समाज जेवढा प्रेमळ तेवढाच निडर आहे. बराक ओबामा यांनाही कोळी गाण्यावर ठेका धरला होता, याची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दिली.
मेट्रो दोन आणि सातचं लोकार्पण झालं. यामध्ये फक्त दहा-पंधरा दिवसात २५ लाख लोकांनी प्रवास केला. फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रोच्या कामाची सुरुवात झाली. पण, अडीच वर्षे काम ठप्प होतं, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.