नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नावे नांदेडमध्ये एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं (Ashok chavan Nanded) आहे. या स्पर्धेचे उद्धाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आयोजकांनी या क्रिकेट स्पर्धेच्या समारोपाला एखाद्या अभिनेत्याला आणा अशी विनंती केली. यावर अशोक चव्हाण यांनी मजेशीररित्या उत्तर दिलं आहे.
येत्या 26 फेब्रुवारीला या क्रिकेट स्पर्धेचा समारोप सोहळा होणार आहे. या स्पर्धेला आयोजकांनी कोणत्या तरी अभिनेत्याला घेऊन या असे सांगितले. यावर उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले, “तुम्ही मला 26 फेब्रुवारीला कोणत्या तरी अभिनेत्याला घेऊन या असं सांगितलं आहे. मला वाटलं सोबत अभिनेत्रींनाही घेऊन या असं सांगाल. आपण अभिनेता आणि अभिनेत्री दोघांनाही आणायचा प्रयत्न करु. पण मी ही हिरोपेक्षा काही कमी नाही. फक्त मला जास्त दाखवता येत नाही कारण आमचं क्षेत्र जरा वेगळं आहे.”
“पण माझ्याही मॅचमध्ये मी चांगला स्कोर केला आहे. काळजी करु नका. त्यामुळे तुमचा गौरव करण्यासाठी, तुमच्या प्रयत्नांना यश मिळत असताना किंवा तुम्हाला प्रोत्साहन देण्याकरिता ज्यांना आणायची गरज लागेल त्यांना नक्की आणू, चिंता करु नका,” असेही अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान मी काय कुठल्या हिरो पेक्षा कमी नाही असे वक्तव्य केल्याने उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच हशा सुरु झाला. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्टेजवरील लोकांनाही हसू आवरलं (Ashok chavan Nanded) नाही.