मी भाजपमध्ये जाणार नाही : हर्षवर्धन पाटील

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

बारामती: पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांना भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली जाणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र या वृत्ताचं हर्षवर्धन पाटील यांनी खंडण करत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. असं असलं तरी इंदापूर विधानसभेच्या […]

मी भाजपमध्ये जाणार नाही : हर्षवर्धन पाटील
Follow us on

बारामती: पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांना भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली जाणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र या वृत्ताचं हर्षवर्धन पाटील यांनी खंडण करत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. असं असलं तरी इंदापूर विधानसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष सुरु असतानाच, हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनं राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं स्वतंत्रपणे लढवल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. मात्र आता यापुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र येत लोकसभेसह विधानसभा निवडणूकही एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादीलाच राहणार की काँग्रेसला दिली जाणार याबाबत संभ्रमाची परिस्थिती आहे.  त्यातच राष्ट्रवादीकडून लोकसभा-विधानसभा निवडणुकीवेळी आघाडी केली जाते आणि विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीकडून घात केला जातो, असा सूर काँग्रेस कार्यकर्त्यांमधून उमटत असल्यानं, आधी विधानसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करावं, अशी आग्रही मागणीही केली जात आहे.

दरम्यानच्या काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी इंदापूरची जागा काँग्रेसला सोडणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभेत आघाडीच्या उमेदवाराचं काम न करण्याची भूमिका घेतली. विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये झालेल्या जाहीर कार्यक्रमात, आम्ही लोकसभेत आघाडी धर्म पाळून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम करतो, मात्र राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीत नेहमीच दगाफटका होतो. त्यामुळं लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेची जागा कोणत्या पक्षाला हे जाहीर करावं, अन्यथा आम्ही लोकसभेत आघाडीचं काम करणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती.

या सर्व घडामोडीनंतर भाजपच्या बारामतीतील स्थानिक नेत्यांनीही हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करुन, लोकसभेची उमेदवारी घेण्याबाबत गळ घालण्यात आला. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं या नेत्यांजवळ स्पष्ट केल्याची चर्चा आहे.

दरम्यानच्या काळात खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच हर्षवर्धन पाटील यांच्यासह आमदार संग्राम थोपटे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांची भेट घेत चर्चा केली होती. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आपल्यावर माजी खासदार स्व. शंकरराव पाटील यांचे संस्कार झाले असून आम्ही सर्वजण आघाडीचा धर्म पाळून, लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे काम करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे राष्ट्रवादीनेही आघाडीचा धर्म पाळावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.

या सर्व घडामोडीनंतर आज हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना ऊत आलं होतं. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांना भाजपकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात येणार असल्याचीही चर्चा चांगलीच रंगली होती. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं सांगत भाजप प्रवेशाच्या चर्चांना विराम दिला.

निवडणूक काळात अशा पद्धतीनं चर्चा करुन संबंधित नेत्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

एकूणच आज राज्यभरात धुळवडीचा सण सुरु असताना राजकीय क्षेत्रातल्या धुळवडीलाही वेग आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं तूर्तास तरी अनेक नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.