पुणे : काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सनसनाटी आरोप केले. पण या आरोपाबद्दल आपल्याला वाईट वाटल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलंय. हे भाषण ऐकल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना फोन केला, पण फोन लागला नाही. त्यामुळे एका जबाबदार व्यक्तीकडे निरोप दिला आहे, माझा निरोप त्यांच्यापर्यंत जाईल, असंही सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.
हर्षवर्धन पाटलांनी पुढील राजकीय वाटचाल ठरवण्यासाठी इंदापुरात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर दगाबाजी केल्याचा आरोप केला. 2009 ला उमेदवारी मागे घे असं सांगण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन केला. नंतर एक फोन करुन उमेदवारी मागे घेऊ नको, असं सांगितलं. हेच का राष्ट्रवादीचं राजकारण, असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला होता.
हर्षवर्धन पाटलांच्या आरोपांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाषणाबद्दल वाचून वाईट वाटलं आणि आश्चर्यही वाटलं. कारण, इंदापूरच्या जागेबाबत अजून चर्चाही झालेली नाही. तीन ते चार दिवसांपूर्वी गणपती दर्शनाच्या निमित्ताने भेट झाली होती. भाषणानंतर मी फोन करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा फोन आजही लागत नाही. त्यामुळे एका जबाबदार व्यक्तीकडे निरोप दिलाय. त्यांनी एवढी टोकाची भूमिका घेतल्याबद्दल आश्चर्य वाटलं. पवार साहेब आणि मी निवडणूक असो किंवा नसो, कायम गाठीभेटी घेत असतो. आम्ही 20014 ला वेगळे लढलो, 2009 ला मी स्वतः प्रचाराला गेले होते आणि यावेळी अजून जागांची चर्चाही झाली नाही,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हर्षवर्धन पाटील यांचा आरोप काय?
आपल्या आयुष्यात शब्द पाळणाऱ्यापेक्षा दगा देणाऱ्यांचीच नावं जास्त आहेत. 2009 मध्येही राष्ट्रवादीने माझ्या विरोधात बंडखोरी केली होती, फॉर्म मागे घेण्यासाठी शरद पवारांनी फोन केला होता, मात्र दुसरा फोन अर्ज मागे घेऊ नका असा आला. खूप अन्याय, अपमान, दगाबाजी सहन केली, मात्र इथून पुढे सहन करणार नाही. आमचा चांगुलपणा बघितला आता आमचा आक्रमकपणा बघा, असा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
शरद पवारांनी मला लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी बोलवलं आणि त्याठिकाणी राष्ट्रवादीचं काम करण्याचं सांगितलं. त्यानंतर सुप्रिया सुळे माझ्या घरी भेटायला आल्या होत्या, त्यानंतर साडेचार वर्षांनंतर पहिल्यांदा अजित पवारांचा फोन आला भेटायला यायचं. दहा वेळा अजित पवारांनी फोन केला होता. आणि त्यानंतर मेळावा घेऊन काँग्रेसने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला, असं हर्षवर्धन म्हणाले.