मुंबई: भाजपच्या (bjp) एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती. पण मी त्याची जाहीर वाच्यता केली नाही. तुमच्या सहकाऱ्याची तक्रार आली आहे, त्याची सत्यता पडताळा असं मी देवेंद्र फडणवीसांना(devendra fadnavis) सांगितलं होतं. एखादी व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी सार्वजनिक जीवनात कार्यरत असेल तर शहानिशा न करता त्यावर बोलणं योग्य नसतं. म्हणून मी फडणवीसांकडे ही तक्रार दिली होती. त्यावर फडणवीसांकडून तुम्ही सांगितलेल्या तक्रारीत मी लक्ष घातलं आहे. या पुढे असं होणार नाही याची काळजी घेऊ असं मला कळवलं गेलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी सांगितलं. शरद पवार यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नसलं तरी भाजपचा हा नेता कोण? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला होता. गिरीश महाजन यांच्याविरोधात सरकारी वकीलच कसा कट रचत आहे याची माहिती फडणवीस यांनी दिली होती. त्यावर शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.
वर्ष सहा महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या सहकाऱ्याबाबत माझ्याकडे तक्रार आली होती. मी त्यांना कळवली. त्यांना सांगितलं त्यात सत्यता किती तुम्ही पाहा. तुमच्या सहकाऱ्याबाबतची ही तक्रार आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनात कार्य करते तेव्हा त्यावर शहानिशा न करता बोलणं योग्य नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर त्यांच्याकडून मला एवढंच कळलं की तुम्ही सांगितलेल्या लोकांच्या तक्रारीत मी लक्ष घातलं. अशाप्रकारच्या गोष्टी होता कामा नयेत याची काळजी घेईल, असं फडणवीसांकडून मला कळवलं गेलं. त्यामुळे हा प्रश्न माझ्याबाबत तिथेच संपला, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. एका शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधीत 125 तासांची रेकॉर्डिंग करण्यात फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले ही कौतुकास्पद बाब आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. 125 तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब आहे. 125 तास रेकॉर्डिंगचं काम करण्याचं काम खरंच झालं असेल तर त्यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा एजन्सी या फक्त भारत सरकारकडे आहेत. त्यामुळे एखाद्या राज्यात जाऊन, राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात जाऊन तास न् तास रेकॉर्डिंग करायला ते यशस्वी झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
ही रेकॉर्डिंग खरी आहे की नाही ते सिद्ध झालं पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार चौकशी करेल. त्याची सत्यता, असत्यता तपासेल. त्यात माझंही नाव घेतलेलं दिसतं. माझं कधी या संबंधात कुणाशी बोलणं व्हायचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या: