अकोला: भाजपचे नेते नितीन गडकरी (nitin gadkari) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. गडकरी हे त्यांच्या काही विधानांमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. या विधानांमुळे गडकरी पक्षात नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चाही आहे. या चर्चांना आता काँग्रेसने (congress) हवा देण्याचं काम केलं आहे. नितीन गडकरी भाजपमध्ये (bjp) नाराज आहेत. भाजपमधील सध्याची परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे गडकरींनी भाजपसोडून काँग्रेसमध्ये आलं पाहिजे. आम्ही गडकरींना आमंत्रण देतो. त्यांनी आमच्यासोबत यावं. आम्ही त्यांचं समर्थन करू, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच या विषया संदर्भात लवकरच नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचंही पटोले यांनी म्हटलं आहे.
अकोला येथे पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले बोलत होते. काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. आमच्या पक्षात कोणत्याही पदाधिकारी, नेत्याला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, भाजपमध्ये तसं नाही. भाजपमध्ये नितीन गडकरी यांना जी वागणूक दिली जात आहे. ती योग्य नाही. त्याला योग्य म्हणता येणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.
नितीन गडकरी सर मला भेटले तर… मी त्यांना सांगेल की तुम्हाला जो त्रास होतो आहे…. ते नेहमी सांगत आहेत… देशात जी सरकार आली आहे ही चुकीची सरकार आहे… जर त्यात तुमचा दम घुटत असेल तर तर आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
नितीन गडकरी नाराज आहेत. मी त्यांना आमच्यासोबत येण्याचं आवाहन करतो. आमच्यासोबत या. आम्ही तुमचं समर्थन करण्यास तयार आहोत. केंद्र सरकारच्या विरोधात बोलल्यास ईडी किंवा सीबीआय मागे लावली जाते. ते आमच्याकडे होत नाही, असंही ते म्हणाले. मी या संदर्भात गडकरींना भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. ते आमच्यासोबत आल्यास त्यांना आम्ही पाठिंबाही देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या पूर्वी अखिलेश यादव यांनी भाजपचे उत्तर प्रदेशातील माजी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांना ऑफर दिली होती. केशव प्रसाद मोर्य यांनी बिहारच्या राजकारणातून काही तरी धडा घेतला पाहिजे. केशव प्रसाद मोर्य 100 आमदारांसह आमच्या पक्षात आले तर आम्ही त्यांना थेट मुख्यमंत्रीपदी बसवू, असं अखिलेश यादव जाहीरपणे म्हणाले होते.