पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली या प्रश्नाची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. पण प्रचाराच्या सांगता सभेत स्वतः अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली याचं उत्तर जाहीर सभेत दिलं. खासदार उदयनराजेंविरुद्ध लढण्याची विचारणा केल्यामुळे मी शिवसेना सोडली, असा गौप्यस्फोट कोल्हेंनी केलाय.
मी शिवसेनेत असताना मला सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरला जात होता. मात्र छत्रपतींच्या गादीशी कधीच गद्दारी करणार नाही ही भावना मनात धरून बाहेर पडलो, असा गौप्यस्फोट अमोल कोल्हेंनी केला.
दुसरीकडे मावळ गोळीबार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा हात असल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून होतो. यावर अजित पवारांनीही उत्तर दिलंय. या देशात-राज्यात सरकार तुमचं आहे, कितीही आणि कशीही चौकशी करा, चौकशीत जर दोषी आढळलो तर देशातल्या कुठल्याही चौकात मला फाशी द्या, मात्र हे आरोप खोटे निघाले तर आरोप करणाऱ्यांना फाशी द्यावी लागेल, असं वक्तव्य शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या सांगता सभेत अजित पवारांनी केलं.
शिरूर लोकसभा मतदारसंघावर गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. पण राष्ट्रवादीने यावेळी अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन या जागेवर विजयाचा दावा केलाय. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध भूमिकेमुळे अमोल कोल्हेंची महाराष्ट्राला ओळख आहे. याचाच फायदा निवडणुकीत होईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादीला आहे.
भाजप-शिवसेना युतीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात 13 मंत्र्यांच्या सभा झाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येक नेत्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. या प्रचार दौऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विमानतळ, बैलगाडा शर्यत बंदी, पुणे-नाशिक रेल्वे मार्ग, महामार्गांवरील वाहतूक कोंडी या प्रमुख मुद्द्यांना लक्ष्य करण्यात आलं. मात्र विरोधकांनी केलेले आरोप हे त्यांचं पाप असल्याचं आढळरावांनी प्रत्येक सभेत ठामपणे सांगितलं.