नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) चेअरमन होण्याची जोरदार चर्चा गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यावर थेट भाष्य करण्यात आलं नसलं तरी काँग्रेससह युपीएमधील मित्रपक्षांनी मात्र यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पवारांना यूपीएचे चेअरमन करण्याच्या चर्चेत काहीच तथ्य नसल्याचे काँग्रेसने नुकतेच स्पष्ट केलं आहे. त्यातच आता समाजवादी पार्टीचे महाराष्ट्रातील नेते आणि आमदार अबू आझमी यांनीदेखील यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. (I sincerely want Sharad Pawar to lead the UPA: Abu Azmi)
आमदार अबू आझमी म्हणाले की, शरद पवारांनी यूपीएचे नेतृत्व करावं अशी चर्चा आहे की नाही याबाबत मला माहिती नाही. पण मी या मताचा आहे की, आजच्या तारखेला काँग्रेसची देशात जी परिस्थिती आहे ते पाहता शरद पवारांनी यूपीएचे नेतृत्व करायला हवं. माझी अशी मनापासून इच्छा आहे.
या गोष्टी जाणूनबुजून पेरल्या जातायत : काँग्रेस
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारीक अन्वर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले की, पवारांना यूपीएचे चेअरमन करण्याच्या चर्चेत काहीच तथ्य नाही. जाणूनबुजून अशा गोष्टी पेरल्या जात आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून या वावड्या उठवण्यात आल्या आहेत. पंरतु, वास्तवाशी या बातमीचा काहीच संबंध नाही. या बातमीत काहीच तथ्य नाही.
अन्वर म्हणाले की, पवारांना यूपीएचे चेअरमन करण्याचा विषय सोडा, त्याबाबत कोणती चर्चाही झालेली नाही, असं सांगतानाच या बातमीत काहीही तथ्य नाही. खुद्द पवारांनाही अशा प्रकारची चर्चा सुरू असल्याचं माहीत नसेल.
यूपीएचा अध्यक्ष काँग्रेसमधूनच
यूपीएचा अध्यक्ष हा सर्वात मोठ्या पक्षातूनच होत असतो. काँग्रेस जेव्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता, तेव्हा यूपीएची स्थापना झाली होती. आजही काँग्रेसच सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसकडे खासदारांचं सर्वाधिक बळ आहे. त्यामुळे यूपीएचा अध्यक्षही काँग्रेसमधूनच होईल यात शंका नाही. आता ज्या पद्धतीने बातम्या सुरू आहेत, त्या आम्ही नाकारत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मीडिया रिपोर्टनुसार, सोनिया गांधी यांच्याकडून यूपीएचं चेअरमनपद पवारांना दिलं जाऊ शकतं. त्याबाबतची प्राथमिक चर्चाही झाली आहे. दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुका आणि हैदराबाद पालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची मागणी होत आहे. राहुल यांनी मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे.
राष्ट्रवादीची सावध प्रतिक्रिया
पवारांकडे यूपीएच्या चेअरमनपदाची सूत्रे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच राष्ट्रवादीने मात्र त्यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजच्या घडीला राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करणं आवश्यक आहे आणि त्या दिशेने मी काम करत आहे, असं शरद पवार यांनी आधीच सांगितलं होतं. विरोधकांचा नेता कोण होईल, हा प्रश्न नाही, तर आधी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे, जनता कंटाळलेली आहे. मजूर, शेतकरी यांच्यामध्ये सरकारविरोधात रोष आहे, त्यामुळे विरोधक एकजूट झाले आणि मतविभाजन टाळलं तर सत्ता परिवर्तन निश्चित आहे. त्या दिशेने शरद पवारांचं काम सुरु आहे” असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
पवारांकडे नेतृत्व म्हणजे सोनिया गांधींवर अविश्वास
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र या चर्चेवर टीका केली आहे. पवारांकडे यूपीएचं नेतृत्व जाणं म्हणजे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
संबंधित बातम्या:
शरद पवार आधी यूपीएचे चेअरमन होणार, नंतर पंतप्रधान? कोण काय म्हणतंय?
शरद पवारांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, काँग्रेसची गळ
पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?; समजून घ्या 12 पॉईंटमधून!
पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राच्या दिग्गज काँग्रेस नेत्याचा पाठिंबा!
(I sincerely want Sharad Pawar to lead the UPA: Abu Azmi)