नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशातील दिग्गज नेते मुलायम सिंग यादव यांनी यूपीच्या राजकारणाला कलाटनी देणारं वक्तव्य केलंय. नरेंद मोदी हेच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत, असं मुलायम सिंग म्हणाले. ते संसदेत बोलत होते. शिवाय त्यांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. विशेष म्हणजे मुलायम यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी बाजूलाच बसलेल्या होत्या.
विरोधक मोदींविरोधात एकत्र येत असतानाच मुलायम सिंग यादव यांनी हे वक्तव्य केल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय. दिल्लीत सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र जमले असून सरकारला घेरण्यासाठी विविध आंदोलनांचं आयोजन केलं जातंय. उत्तर प्रदेशातही मुलायम सिंग यांचा पक्ष आणि मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.
लोकसभेत बोलताना मुलायम सिंग म्हणाले, मला पंतप्रधानांना शुभेच्छा द्याव्या वाटतात, की त्यांनी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केलाय. मला हे म्हणायचंय की सर्व सदस्य पुन्हा निवडून यावेत आणि तुम्ही (नरेंद्र मोदी) परत पंतप्रधान व्हावेत, असं म्हणत मुलायम यांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
एकीकडे सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना एका कार्यक्रमात जाण्यापासून रोखल्यानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण तापलंय. तर दुसरीकडे अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंग यांनीच भाजपची पुन्हा सत्ता येण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे मोदींविरोधातील विरोधकांच्या एकीवर मुलायम सिंग यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
यूपीत सर्वाधिक लोकसभेच्या जागा
लोकसभा जिंकायची असेल तर उत्तर प्रदेशात जिंकणं महत्त्वाचं असतं. कारण, लोकसंख्येनुसार देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात सर्वात जास्त 80 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यूपीत सर्वाधिक 72 जागा जिंकत विरोधकांचा सुपडासाफ केला होता. पण यावेळी सपा आणि बसपाने एकत्र येत मतविभाजन टाळण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भाजपसाठी एवढ्या जागा जिंकण्याचा मार्ग खडतर मानला जातोय.