जालना: भाजपा आणि शिवसेनेची युती झाली असली तरी जालन्यातील युतीचा तिढा मात्र सुटलेला नाही. शिवसेना नेते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांचं हाडवैर सर्वश्रृत आहे. त्यामुळे युती झाली असली तरी जालना लोकसभा मतदारसंघाचे मैदान मी सोडलेले नाही, असा थेट इशारा अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंना दिला. त्यामुळे युतीत पहिला मिठाचा खडा पडला आहे.
जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर अशी निवडणूक रंगण्याची चिन्हे आहेत. विधानसभा आणि लोकसभेसाठी युती झाली असली तरी येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.
युती संदर्भात सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना असल्याने आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र जालना लोकसभेची शिवसेनेला सोडण्याची आमची मागणी आहे, असं अर्जुन खोतकर म्हणाले.
वाचा: जालना लोकसभा : 20 वर्षांपासून खासदार, पण दानवेंविरोधात नाराजी कायम
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना निवडणुकीत पाडण्यासाठी खोतकरांनी सातत्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तशी भूमिका त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. मात्र आता शिवसेना-भाजपची युती झाल्याने अर्जुन खोतकर आता नेमकी काय भूमिका घेणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, अर्जुन खोतकर यांनी आपली भूमिका कायम ठेवली तर ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू शकतात, अशीही चर्चा आता जालन्यात रंगू लागली आहे.
संबंधित बातम्या
पराभव दिसल्यावर माणूस चवताळतो, दानवेंची अवस्था तशीच झालीय : खोतकर
रावसाहेब दानवेंची गावरान भाषेत अब्दुल सत्तार आणि खोतकरांवर टीका
रावसाहेब दानवेंविरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला!
‘त्यांच्या’ खात्यात 5000 जमा होणार, दानवे की बोली और बंदूक की गोली