जळगाव : भाजप सोडण्याबाबतच्या ज्या बातम्या सध्या दाखवल्या जात आहे, त्या सर्व खोट्या असून, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय, असं स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलंय. काँग्रेसने मला त्यांच्या पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं, ज्यावर मी स्पष्टीकरण देत होतो. पण दिशाभूल करणाऱ्या बातम्या दाखवल्या जात असल्याचं खडसेंनी म्हटलंय.
“ज्या काही बातम्या ह्या वृत्तवाहिन्यावर सुरू आहेत, त्यात काही तथ्य नाही. कारण, माझ्या बोलण्याचा विपर्यास करून त्यात दाखवलं आहे. ह्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. माझं पूर्ण बोलणं जर ऐकलं तर काँग्रेस ज्या नेत्यांनी मला म्हटलं की तुम्ही आमच्या पक्षात या आणि मी त्यांना उत्तर दिलेलं आहे की जे तुमच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही,” असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलंय. वाचा – कुणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून बसत नाही, खडसेंच्या वक्तव्यानं खळबळ
“माझ्या स्वागतासाठी काँग्रेसच काय, तर अन्य पक्षही माझ्या स्वागतासाठी तयार आहेत. एखादा व्यक्ती अनेक वर्षे राजकारण करत असेल तर त्याने पक्षात यावं जेणे पक्ष बळकट करण्यासाठी ते मला त्यांच्या पक्षात बोलावत आहेत. परंतु माझी पक्षावर (भाजपवर) कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. काँग्रेसला जरी वाटत असेल की नाथाभाऊंनी आमच्याकडे यावं, पण माझी तशी इच्छा नाही, असं खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे नेमके काय म्हणाले?
काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी खडसेंवर झालेल्या अन्यायाला व्यासपीठावर वाचा फोडून खडसेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन उल्हास पाटील यांनी यावेळी केलं. त्याला उत्तर देत खडसेंनी पुन्हा भाजपला सोडचिठ्ठी देण्याचं सूतोवाच केलं आहे. कुणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून बसत नाही, अन्याय झाला तेव्हा वेळीच त्याचा प्रतिकार देखील करायला हवा, तरच समोरच्याला आपल्या शक्तीची जाणीव होते, असाही टोला खडसे यांनी यावेळी लगावला.