बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील 14 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये काही हायप्रोफाईल लढती आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे बारामती. या मतदारसंघाची चर्चा मतदानाअगोदर धमक्यांमुळेच जास्त आहे. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरण शांत होत नाही, तोच आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी थेट शिवसेना आमदाराला धमकी देऊन टाकली. बहीण-भावाच्या या धमकीसत्रांची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे सध्या युतीच्या बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांचा जोरदार प्रचार करत आहेत. यादरम्यान ते विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंवर टीकाही करत आहेत. पण हे अजितदादांच्या जिव्हारी लागलं आणि त्यांनी शिवतारेंना धमकीच देऊन टाकली. तू 2019 आमदार कसा होतो हेच बघतो, अशी धमकी अजित पवारांनी दिली.
धमकीचा व्हिडीओ :
काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या माजी युवक जिल्हाध्यक्ष राहुल शेवाळेंना फोन करून धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यासंदर्भातील चर्चा थांबत नाही तेच अजितदादांची दिलेल्या धमकीची चर्चा सुरू झाली आहे. मी राष्ट्रवादीतून भाजप प्रवेश केल्यामुळे मला सुप्रिया सुळेंनी धमकी दिली असा आरोप राहुल शेवाळेंनी केला होता.
बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यात भाजपने बारामतीची लढत अधिकच प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांच्या अशा धमकी प्रकरणांमुळे त्यांच्याच अडचणी वाढताना दिसत आहेत.