संदीप जाधव, औरंगाबाद: शिवसेनेचे नेते दिवाकर रावते (diwakar raote) आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना शिवसेनेने विधान परिषदेची उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या ऐवजी नंदूरबारमधील शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी आणि सचिन अहिर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात येणार आहे. रावते आणि देसाई यांचा पत्ताकट झाला नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर पक्ष वेगळी जबाबदारी देणार आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच स्पष्ट केलं. त्यानंतर सुभाष देसाई (subhash desai) यांनीही त्याला दुजोरा देत आपण विधान परिषदेसाठी अर्ज भरणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देसाई हे विधान परिषदेवर जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सहा महिन्यानंतर त्यांना उद्योग खातंही सोडावं लागणार आहे. त्यामुळे अहिर हे विधान परिषदेवर गेल्यास त्यांच्याकडे उद्योग खाते जाणार की इतर कुणाकडे उद्योग खात्याची सोपवली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादेत सभा आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सुभाष देसाई औरंगाबादेत आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमचे सर्व उमेदवार निवडून येतील. आमचं सरकार स्थिर आहे. आमचे आमदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असं सांगतानाच विधान परिषदेत मी माघार घेतोय. मी अर्ज भरणार नाही. कारण मीच उमेदवार ठरवत आहे, असं देसाई यांनी सांगून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
विधान परिषदेसाठी आम्ही नवीन चेहऱ्याना संधी दिली आहे, एक दिलाने निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार, असल्याचा दावा त्यांनी केला. कालच्या बैठकीला सर्व आमदार उपस्थित होते, असंही ते म्हणाले.
दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांचा पत्ताकट झाला असा शब्द वापरणं चुकीचं आहे. देसाई आणि रावते हे दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत. शिवसेनेचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी शिवसेनेला आपलं आयुष्य दिलं आहे. पण पक्षाचे काही निर्णय असतात. त्या प्रवाहात हे दोन्ही नेते सहभागी असतात. त्यामुळे पत्ताकट हा शब्द वापरणं योग्य नाही. पक्ष त्यांना मोठी जबाबदारी देणार. त्यांचं कार्य खूप मोठं आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना तिकीट मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
विधानपरिषदेवर शिवसेना कुणाला पाठवणार याची घोषणा शिवसेनेने केलेली नाही. पण शिवसेनेचे नंदूरबार जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांनी आपल्याला विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. तर दुसऱ्या नावासाठी अहिर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अहिर यांना विधान परिषद दिल्यास वरळी मतदारसंघात तीन आमदार असतील. अहिर हे वरळीचे आहेत. सुनील शिंदे हे वरळीचे असून त्यांना विधान परिषदेवर पाठवलेले आहे. तर आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडून आलेले आहेत.