सांगली : भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील या आघाडीमध्ये प्रवेश करताच त्यांना सांगली मतदारसंघातून उमेदवारीही देण्यात आली. पण गोपीचंद पडळकरांचे काही फोटो व्हायरल झालेत, ज्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करताच नव्या वादाला तोंड फुटलंय. या फोटोंवर पडळकरांनी स्पष्टीकरणही दिलंय.
गोपीचंद पडळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे धारकरी असल्याचा मेसेज व्हायरल होतोय. शिवाय पडळकरांचे संघाच्या गणवेशातील आणि भिडेंसोबतचेही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंवर पडळकरांनी स्पष्टीकरण दिलंय. मी संघासाठी काम केलं, पण आता भाजपशी संबंध संपला आहे, असं ते म्हणाले.
मी यापूर्वी आरएसएसचं काम करत होतो, हे मी मान्य करतो. पण मी भाजपा सोडली आहे. त्यामुळे त्यांच्या संबंधीत संघटनांशी माझा आता संबंध राहिलेला नाही. मात्र मला उमेदवारी मिळू नये यासाठी स्वाभिमानी आणि काँग्रेसवाले हे माझे जुने फोटो व्हायरल करत आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांच्याकडून करण्यात आला.
सांगलीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर, भाजपचे संजय काका पाटील आणि आघाडीकडून (काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी) विशाल पाटील हे उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीने सांगलीत अगोदर जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी दिली होती, पण नंतर पडळकरांना ही उमेदवारी देण्यात आली.
प्रकाश आंबेडकर यांच्याकडून एकीकडे संघावर जोरदार टीका केली जाते, तर दुसरीकडे त्यांच्याकडून धारकऱ्याला उमेदवारी देण्यात आल्याचीही टीका केली जात होती. पण तरीही वंचित बहुजन आघाडीने गोपीचंद पडळकरांनाच उमेदवारी दिली आहे. पडळकर हे भाजपात असले तरी त्यांनी धनगर आरक्षणप्रश्नी भाजपविरोधातच दंड थोपटले होते. अखेर त्यांनी पक्षाला रामराम केला.