रायपूर: पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ झालाय. गेल्या 15 वर्षांपासून सत्ता असलेलं मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हातातून गेलंय, तर राजस्थानमध्येही काँग्रेसची सत्ता आली आहे. पण भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेकांना या निकालाचा मोठा फटका बसलाय. अशीच गोष्ट छत्तीसगडमधील एका आयएएस अधिकाऱ्याची आहे. कलेक्टर असलेल्या या अधिकाऱ्याने सरकारी नोकरी सोडून भाजपात प्रवेश केला. पण छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत पराभव गेल्याने ‘ना घर का ना घाट का’ अशी परिस्थिती या अधिकाऱ्याची झाली आहे.
ओपी चौधरी यांनी राजीनामा देऊन थेट भाजपात प्रवेश केला होता. लोकसभेत किंवा इतर राज्यांच्या विधानसभेत भाजपची कामगिरी पाहता आजही अनेक उमेदवार भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छूक असतात. मात्र पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. हिंदी भाषिक मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केला आहे. याचा फटका भाजपमध्ये बाहेरुन आलेल्या उमेदवारांना बसला आहे.
रायपूर पूर्वचे माजी कलेक्टर ओ. पी. चौधरी यांनी आयएएसची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. ओ. पी. चौधरी यांनी खरसिया मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांचा पराभव काँग्रेसच्या उमेश पटेल यांनी केला. मतदान पाहिले तर ओ. पी. चौधरी यांना 77,234, तर विजयी उमेदवार उमेश यांना 94,201 मत मिळाले आहेत.
निवडणूक सुरु होण्याआधीच कलेक्टर ओपी चौधरी यांनी मोठ्या थाटात भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ओ. पी. चौधरी हे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या जवळचे असल्याचं बोललं जातं.
ओ. पी. चौधरी 2005 च्या बॅचचे आयएएस आधिकारी आहेत. त्यांनी 22 ऑगस्टला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रायपूरचे कलेक्टर म्हणून काम केलेल्या चौधरी यांनी नक्षल प्रभावी भागातही काम केलं आहे, तसेच ते दंतेवाडाचे कलेक्टर राहिले आहेत. चौधरी यांना उत्कृष्ट प्रशासनिक कामांसाठी प्रधानमंत्री पुरस्कारही मिळाला आहे.
छत्तीसगडमधील मतदान पाहिले तर, काँग्रेस 68 जागांवर निवडून आली आहे. भाजपा केवळ 15 जागेवर तर बसपा दोन जागांवर आणि जनता काँग्रेस पार्टी पाच जागांवर निवडून आली आहे. मतदानाची टक्केवारी पाहिली तर काँग्रेसला 43 टक्के, भाजप 33 टक्के, बसपा 3.9 टक्के आणि जेसीसीजेला 7.6 टक्के मत मिळाले आहे.