मुंबई : राज्यात (Shiv sena) शिवसेना आमदारांच्या बंडानंतर हे लोण आता लोकसभेतही निर्माण झाले आहे. (Shiv Sena MP) शिवसेनेतील 12 खासदर हे शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र, या खासदारांनी लोकसभेत गट निर्माण केला तर त्यांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ज्याप्रमाणे राज्य विधीमंडळात आमदारांनी गट निर्माण केल्यानंतर शिवसेना कोर्टात गेली त्याच प्रकारे खासदारांनी भूमिका घेतली तर येथेही कोर्टात जाणार असल्याचा इशारा (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात तेच देशाच्या राजकारणात घडताना पाहवयास मिळत आहे. शिवसेनेतील 12 खासदारांनी शिंदे गटात सहभाग नोंदवल्यानंतर लागलीच शिवेसेनेच्यावतीने खा. संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. त्यामुळे खासदारांच्या भूमिकेवर काय परिणाम होणार का हे पहावे लागणार आहे.
शिवसेनेतील आमदारांपासून सुरु झालेले बंड नगरसेवक, जिल्हा प्रमुख, पदाधिकारी, महापौर याद्वारे आता खासदारांपर्यंत पोहचले आहे. शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड करुन शिंदे गट बनवला आहे. एवढेच नाही तर हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, बंडखोर आमदार अपात्र असून त्यांच्यावर कारवाई व्हावी याबाबत शिवसेनेने याचिका दाखल केली आहे. 20 जुलै रोजी याची सुनावणी असून त्यानंतरच काय होणार ते समोर येणार आहे. तर दुसरीकडे खासदारांनीही आपला गट शिंदे गटात सहभागी होत असल्याचे स्पष्ट केले आहे. 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश करुन कार्यकरणी देखील स्थापित केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला शिवसेना हाच खरा पक्ष आहे. इतर जे आहेत ते गट आहेत. आणि गटांना कार्यकरणी बरखास्त करण्याचा अधिकार दिला कुणी असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. जे पक्षात आहेत तेच खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे यासंदर्भात कोणी वेगळी भूमिका घेतली तर याचिका दाखल करुन न्यायालयीन लढाई लढली जाईल असाही इशारा राऊतांनी दिला आहे.
शिवसेना पक्षाची स्थापनाच ही संघर्षातून झाली आहे. त्यामुळे आमदार आणि खासदारांनी पक्ष सोडला शिवसैनिक हे बरोबर आहेत. त्यामुळे याचा काही परिणाम पक्षावर होणार नाही. ग्राउंड स्तरावर वेगळे चित्र आहे. शिवसैनिकांच्या जोरावर पक्ष पुन्हा उभारी घेईल यामध्ये शंका नाही. अनेकांनी बंडखोरी करीत गट निर्माण केले. पण शिवसेना पक्ष हा कायम राहिल आणि खासदारांच्या बंडाने देखील पक्षावर परिणाम होणार नसल्याचा विश्वास त्यांनी राऊतांनी व्यक्त केला आहे.