लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मोठमोठे दावे आणि प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा दावा केला आहे. केंद्रात मोदी सरकार आलं नसतं तर अजित पवार महायुतीतून बाहेर पडले असते, असा खळबळजनक गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. अजितदादांच्या सर्व प्रकारच्या चौकश्या बंद झाल्या आहेत. प्रफुल्ल पटेल यांचं ईडी प्रकरण बंद झालं आहे, भुजबळांचंही तेच झालं आहे. त्यामुळे ते बाहेर पडणार होते. ही नवी आयडिया आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. अजितदादांच्या गटाला मंत्रीपद का दिलं नाही हा त्यांचा अंतर्गत प्रशन आहे. कुणालाही मानसन्मान हा संख्याबळावर मिळतो. अजित पवार यांची स्थिती मानसन्मान मिळावा अशी राहिलेली नाही. त्यांनी आता जे मिळेल ते घ्यावे. राज्यमंत्रीपद मिळाले तर ठिक. नाही तर तेही मिळणार नाही, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी अजितदादांना लगावला आहे.
जेडीयूसारख्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं. भाजपवाले पाठिंबा घेतात आणि पक्ष फोडतात. पुढच्या सहा महिन्यात कळेलच. उद्धव ठाकरे यांनना हे आधीच समजले होते. वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे, असं सांगतानाच सरकार किती दिवस टिकेल हे पाहावं लागेल, असं वडेट्टीवार म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार पुन्हा ठाकरे गटात येण्याच्या चर्चा आहेत. त्यावरही विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. त्यांना आता बोलायला जागा राहिली नाही. गद्दारीचा शिक्का बसलेली मंडळी आहे. त्यांचा पक्ष संपला आहे. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांची घर वापसी होईल अशी परिस्थिती आहे. ते आमदार संपर्क साधत असल्याची माहिती आहे. वारे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे हे त्यांनाही कळून चुकलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मोदी सरकारचा शपथविधी सुरू असताना दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला केला. त्यावर विचारता वडेट्टीवार यांनी मोदी सरकारच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्यांची यादीच वाचून दाखवली. 370 कलम हटवून काय झाले? किती काश्मिरी पंडितांची घरवापसी झाली? 10 लोकांचा जीव जातो, मोदी फार काही करू शकले नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिंदे सरकारचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्यावरूनही त्यांनी टोला लगावला. जाता जाता काही लोकांना खूश करून जायचा प्रयत्न असेल, असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला.