सांगली : सध्या देशातील हिंदूंचे फार हाल सुरु आहेत. संभाजी भिडे गुरुजींसारखे पंतप्रधान मिळाले (Sambhaji Bhide Prime Minister) तरच हिंदू धर्म वाचेल, असं वक्तव्य करणी सेनेचे राज्य अध्यक्ष अजयसिंह सिंगर (Ajaysingh Singar Karni Sena) यांनी केलं. ते सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीच्या सांगता समारंभात बोलत होते.
नवरात्र उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीची आज हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. गेली नऊ दिवस सुरू असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची आज विजयादशमी दिवशी सांगता होते. या समारोप दौडीत हजारो धारकरी धावले.
यावेळी करणी सेनेचे अजयसिंह सिंगर (Ajaysingh Singar Karni Sena) म्हणाले, “सध्या देशातील हिंदूचे फार हाल सुरू आहेत. संभाजी भिडे गुरुजी हेच हिंदू धर्माचे खरे धर्मगुरु आहेत. संभाजी भिडे गुरुजींसारखे पंतप्रधान मिळाले (Sambhaji Bhide Prime Minister) तरच हिंदूधर्म वाचेल.”
दौडीच्या सांगता समारंभास शिवसेना खासदार धैर्यशील माने, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, करणी सेनेचे राज्य अध्यक्ष अजयसिंह सिंगर यांनी उपस्थिती लावली होती.
नवरात्रीच्या काळात दररोज पहाटे श्री शिवप्रतिष्ठानची दौड निघते. या दौडीला 36 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. यंदाच्या वर्षीही 30 सप्टेंबरपासून सांगलीसह संपूर्ण राज्यात श्री दुर्गामाता दौड सुरू होती. आज दसऱ्याच्या दिवशी या दौडीचा समारोप करण्यात आला.
”जयभवानी-जयशिवाजी च्या जोरदार जयघोषाने धारकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. डोक्याला फेटा किंवा गांधीटोपी घालून दौडीत शिवभक्त सहभागी झाले होते. दौडीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. देशप्रेमाच्या घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी खा. धैर्यशील माने आणि आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर मारुती चौकातून दौडीला प्रारंभ झाला. राजवाडा चौक, वखारभाग, कॉलेज कॉर्नरमार्गे निघालेली दौड दुर्गामाता मंदिराजवळ पोचली. त्याठिकाणी प्रेरणामंत्र आणि ध्येयमंत्र झाल्यानंतर दौड मीरा हौसिंग सोसायटी, संभाजी कॉलनी, टिंबर एरिया, कॉलेज कॉर्नर, आमराई, वखारभागमधून निघालेली दौड शिवतिर्थाजवळ विसर्जित झाली.
VIDEO :