हिंगोली | 26 नोव्हेंबर 2023 : उत्तर प्रदेशात राज्य कुणाचं आलं. बिहारमध्ये कुणाचं आलं, तामिळनाडूत कुणाचं आलं याचा विचार ओबीसींनी केला पाहिजे. भुजबळ साहेब तुम्ही आमचे नेते आहात. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळांनी पक्ष काढला असता तर महादेव जानकर इकडे मुख्यमंत्री झाला असता, असं विधान रासपचे नेते महादेव जानकर यांनी केलं आहे. हिंगोलीत ओबीसी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भूतकाळात आमच्या काही चुका झाल्या आहेत. आता कुणाला शिव्या देण्यात वेळ घालवू नका. आता सत्ताधारी झालं पाहिजे. आपल्याला महात्मा फुले यांचा वारसा आहे. अमेरिकेत गेलो होतो. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बघून तासभर थांबलो होतो, असं सांगतानाच आम्ही 100 मध्ये 85 असू तर छोट्या लोकांना तिकीट का मागायचं? आपण मागणारे नाही. तर देणारे झालो पाहिजे, असं आवाहन महादेव जानकर यांनी केलं आहे.
आपण कोणत्या धर्मावर जातीवर टीका करू नये. यापुढे सत्ताधारी व्हायचा विचार करा. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा नगरसेवक होण्यापेक्षा फक्त आमदार आणि खासदारच होईल याचा विचार केला पाहिजे. मी छोटा माणूस आहे. माझ्या पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली. मी चार आमदार निवडून आणले. 93 जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
कांशीराम यांनी चर्मकार समाजाचा मुख्यमंत्री बनवला. आपणही राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. आज आमचं काय म्हणणं? महाराष्ट्र कुणाला तिकीट मागत आहोत? भुजबळ साहेब कंमाडर बना, असं जानकर म्हणाले.
तुम्ही जर आम्हाला चॅलेंज देत असाल तर आम्ही तुम्हाला चॅलेंज देऊ. ज्याला आमच्याबरोबर यायचं असेल तर या. आमचं म्हणणं नाही. दलित आणि मुस्लिमांना तुम्ही अपील करा. समाजकारण बाजूला ठेवा आणि राजकारणी व्हा. भुजबळांसाहेब आम्ही तुमच्या बरोबर युती करणार. आम्ही त्यांच्याबरोबर युती करणार नाही. समता युग आणावं लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.