मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारशी आमचं कोणतंही वैयक्तिक भांडण नाही. केवळ महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून राज्यकर्त्यांची कोंडी करायची, हे योग्य नव्हे. हे राष्ट्रीय एकात्मता आणि संसदीय लोकशाहीला धरुन नाही. कोरोनामुळे (Coroanvirus) महाराष्ट्र कोलमडला तर देशही कोलमडेल, ही गोष्ट विरोधी पक्षनेत्यांना माहिती असायला हवी, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. (BJP should support Lockdown says Sanjay Raut)
ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाचे समर्थन केले. मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय हा काही आनंदाने घेत नाहीत. आपातकालीन परिस्थितीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना असे निर्णय घेणे अपरिहार्य असते. अशावेळी आपला वैयक्तिक दृष्टीकोन वेगळा असला तरी एक राज्य म्हणून महाविकासआघाडीतील घटकपक्ष आणि विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत राजकीय पक्षांची मतं वेगवेगळी असू शकतात. महाविकासआघाडीतील घटकपक्ष आणि विरोधी पक्षांचे मत याबाबत वेगळे असू शकते. मात्र, लॉकडाऊन करायचा की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांनाच आहे. आपातकालीन परिस्थितीत राज्याच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांना असा निर्णय घ्यावा लागू शकतो, असे राऊत यांनी म्हटले.
यावेळी संजय राऊत यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या काँग्रेसला हळुवार चिमटाही काढला. आता लॉकडाऊन हादेखील इतर विषयांप्रमाणे काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे किंवा नाही, हे मला माहिती नाही. पण माझ्या मते हा राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, असे राऊत यांनी सांगितले.
यावेळी संजय राऊत यांनी कोरोना परिस्थितीतील महाराष्ट्राच्या कामगिरीचे कौतुक झाले पाहिजे, असे म्हटले. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत, ही बाब मान्य आहे. मात्र, महाराष्ट्राचा कोरोना चाचण्याच जास्त होत असल्यामुळे रुग्णही जास्त सापडत आहेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतूक केलंच पाहिजे.
दुसऱ्या राज्यांमध्ये इतक्या मोठ्याप्रमाणावर कोरोना टेस्ट होत नाहीत. कोण कुठे जातंय, कशाने मृत्यू झाला, का आजारी आहे, याची कसलीच माहिती इतर राज्यांकडून ठेवली जात नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर जसे अत्याचार केले अगदी तसंच घडतंय; मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका
(BJP should support Lockdown says Sanjay Raut)