सोलापूर: उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्यासाठी राखून ठेवलेल्या पाणीसाठ्यातील एक थेंबही इंदापूरला गेला तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी केले. सोलापूरच्या वाटणीच्या पाण्याचा एक थेंबही इंदापूरला जाणार नाही, या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. त्यानंतरही सोलापूर जिल्ह्याला डावलून इंदापूरला पाणी दिले तर मी मंत्रिपद आणि आमदारकी सोडून राजकारणातून संन्यास घेईन, असे भरणे यांनी म्हटले. (NCP leader Dattatray Bharane on water issue between Solapur and Indapur)
ते शुक्रवारी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’, हा माझा जुना व्हीडिओ मोडतोड करून वापरला जात असल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री सोलापूरमध्ये एक बोलतात आणि इंदापूरला एक बोलतात, असा गैरसमज पसरविला जात आहे. काही राजकीय लोक विनाकारण गैरसमज पसरवत आहेत, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले.
सांडपाण्याच्या नावाखाली सोलापूरच्या उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी निंबोळी योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्तक्षेपामुळेच हे पाणी वळवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याला सोलापूरकरांनी विरोध केला आहे.
या कृत्याचा निषेध म्हणून सोलापुरात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पाणी बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीने येत्या 1 मे रोजी सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी पळवल्याने जिल्ह्यातील उसाचे क्षेत्रही निम्मे कमी होऊ शकते. या विरुध्द जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार व आमदारांनी या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
हर्षवर्धन पाटील यांना धक्का, खंद्या समर्थकाने सर्व पदं सोडली, भरणेंचे कार्यकर्ते घरी!
मंत्रिपद हे मिरवण्याची गोष्ट नाही, त्याचा उपयोग सर्वसामान्यांना व्हायला हवा : दत्तात्रय भरणे