सोलापूर: सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिंदे गट (Eknath Shinde) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांनी दसरा मेळाव्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आमच्याच दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होणार असा दावा दोन्ही गटाकडून केला जात आहे. तुम्ही दसरा मेळाव्यात बोलणार का?, जर बोलण्याची संधी मिळाली तर काय बोलणार असा प्रश्न शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांना विचारला असता त्यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. माझं दसरा मेळाव्यात भाषण होणार आहे की नाही हे अद्याप निश्चित नाही. मात्र मला मुख्यमंत्र्यांनी बोलण्याची संधी दिली तर मी निश्चित बोलेल असं शाहाजीबापू यांनी म्हटलं आहे.
दसरा मेळाव्यात नेमकं काय बोलणार याबाबत बोलताना शाहाजीबापू म्हणाले की माझ्या भाषणात प्रामुख्याने दोन विषय असतील, एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाचे विचार घेऊन पुढे निघाले आहेत. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे विचार हे शरद पवार आणि सोनिया गांधींचे विचार आहेत. तर दुसरा विषय असा आहे सध्या राज्यात एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांचं सरकार आहे. एकनाथ साहेब हे दणकट आहेत. तर फडणवीस साहेब हे ज्ञानेश्वाराप्रमाणे बुद्धीमान आहेत. या दोघांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
यावेळी शाहाजीबापू पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देखील सल्ला दिला आहे. तुम्ही कोणाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणार असं अजित पवार यांना विचारलं होतं, तेव्हा त्यांनी मी आधी उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकेल असं म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना शाहाजीबापू पाटील यांनी अजित पवार यांना सल्ला दिला आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. काम असं करा की तुमचं भाषण लोकांनी ऐकलं पाहिजे असं पाटील यांनी म्हटलं आहे.