मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या सामनामधून रविवारी संजय राऊत (Sanjay Raut) यांचा ‘रोखठोक’ या सदरात लेख प्रकाशीत झाला. मात्र सध्या संजय राऊत हे पत्राचाळ प्रकरणात ईडी (ED) कोठडीत आहेत. मग कोठडीत असताना त्यांनी लेख लिहिला कसा असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता. तसेच या प्रकरणात खुलासा करताना ईडी अधिकाऱ्यांनी देखील सांगितले आहे की, असे करणे बेकायदेशीर आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी करण्यात येईल. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे तुरुंगात असताना कोणतीही व्यक्ती अशाप्रकारचा लेख लिहू शकत नाही. लेख लिहायचा असेल तर त्यासाठी न्यायालयाच्या विशेष परवानगीची आवश्यकता असते. जोपर्यंत न्यायालयाची विशेष परवानगी मिळत नाही तोपर्यंत असा लेख लिहिता येत नाही. त्यामुळेच आता या प्रकरणात ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येणार आहे. रविवारी प्रकाशित झालेल्या ‘रोखठोक’मध्ये संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली होती.
मुंबईमधून जर राजस्थानी आणि गुजरातील समाज गेला तर मुंबई आणि महाराष्ट्रात पैसा शिल्लक राहणार नाही असे वक्तव्य राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यानंतर राज्यपाल यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका केली. संजय राऊत यांनी देखील आपल्या रोखठोक या सदरातून राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला. जेव्हा मराठी उद्योजक साखर कारखाने, गिरण्या आणि इतर उद्योग चालवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ईडी त्यांच्यावर कारवाई करते इंडीच्या करवाईचा फास त्याच्याभोवती आवळला जातो यावर देखील राज्यापालांनी काहीतरी बोलायला हवं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील राऊत यांच्या रविवारच्या रोखठोक या सदरावर प्रतिक्रिया दिली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक असलेले राऊत हे तुरुंगातून लेख लिहायला काय स्वातंत्र्यसेनानी आहेत काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.आता याच प्रकरणात राऊत यांनी लेख कसा लिहिला याची चौकशी होणार असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.