औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या शेवटच्या टप्प्यात औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी या निर्णयावर आपलं मत व्यक्त केलंय. हा नामांतराचा मुद्दा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात हा मुद्दा नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय पूर्णपणे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होता असेही त्यांनी सांगितले. बैठकीत मते व्यक्त करण्यात आली, मात्र मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिक्कामोर्तबब मुख्यमंत्री करतात. मुख्यमंत्र्यांचे निर्णय हाच मंत्रिमंडळाचे निर्णय म्हणून जाहीर करण्यात येतो. या निर्णयाची माहिती नंतर मिळाल्याचं सांगत, हा पूर्णपणे शिवसेनेचा होता असे सांगत या निर्णयापासून अंतर राखण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला आहे. पवारांनी आपलं मत व्यक्त केल्यानंतर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पवारांवर निशाणा साधलाय.
शरद पवार यांनी नियम सांगितला की फायनल अथॉरिटी कोण असतं. तर मुख्यमंत्री फायनल असतो असं मुख्यमंत्री म्हणाले. पण त्यांच हे म्हणणं चुकीचं आहे. जे मंत्री कॅबिनेटमध्ये बसतात त्यांना अधिकार असतो. पण शरद पवार यांचं म्हणणं आहे की आम्हाला माहिती नव्हतं. हे त्यांचं मत हास्यास्पद आहे. काँग्रेसनं स्टॅन्ड घेतला की आम्ही विरोध केला नाही. जे झालं ते झालं, असं म्हणाले. अशोक चव्हाण यांनी सांगितलं की औरंगजेबाने संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली. मग माझा प्रश्न आहे की अशोक चव्हाण कधी भारतीय जनता पार्टी जॉईन करणार?, असा सवालही त्यांनी केलाय.
औरंगाबाद आणि संभाजीनगरच्या मुद्द्याला हिंदू आणि मुस्लिम या नजरेतून बघू नका. शरद पवार यांना हे स्पष्टीकरण द्यायला का वेळ लागला? असा सवालही त्यांनी केलाय. शहराचे नाव बदलण्यासाठी शासकीय पातळीवर 1 हजार कोटी रुपये खर्च येतो. सगळे नावं बदलणं, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, दुकानाची नावं, सर्टिफिकेट हे सगळं बदलावं लागणार, याचा खर्च कोण करणार? असा सवालही जलील यांनी केलाय.
शरद पवार औरंगाबादेत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आले आहेत. शरद पवार यांना माहिती नव्हतं तर मग कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरे मंत्र्यांना गाणी ऐकायला बोलावत होते का? जयंत पाटील का बैठकीतून बाहेर पडले नाहीत? असा प्रश्नही इम्तियाज जलील यांनी शरद पवारांना केलाय.