औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादची जागा एमआयएमसाठी सोडण्याचा निर्णय घेतलाय. या जागेवर एमआयएमचे औरंगाबादमधील आमदार इम्तियाज जलील इच्छुक आहेत. त्यांच्यासाठीच ही जागा सोडण्यात आली आहे. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. वंचित बहुजन आघाडीने 37 जागा जाहीर केल्या आहेत, उर्वरित 11 जागा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा करुन जाहीर करु, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मी असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा केली आणि ते औरंगाबादमधून उमेदवार देण्यासाठी तयार आहेत. एमआयएमकडूनच नाव जाहीर केलं जाईल. आम्ही त्यांना मुंबईतून लढण्याचीही विनंती केली आहे. मुंबईतून लढायचं की नाही याबाबत ओवेसी पुढच्या दोन दिवसात निर्णय घेतील, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून एमआयएमने उमेदवार द्यावा, असं आंबेडकर म्हणाले. या मतदारसंघात सध्या भाजपच्या पूनम महाजन खासदार आहेत.
इम्तियाज जलील यांच्याकडून जागेची मागणी
वंचित बहुजन आघाडी औरंगाबादेतून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. पण यावर इम्तियाज जलील यांचा आक्षेप होता. यासाठी त्यांनी ओवेसींशी संपर्क साधून औरंगाबादची जागा एमआयएमला सोडण्याची मागणी केली.
मी लोकसभा निवडणूक लढवावी अशी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, ही भावना मी माझ्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहे. याबाबत दोन दिवसात निर्णय होईल. न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील हे चांगले जस्टीस आहेत, विधीज्ञ आहेत, पण त्यांना औरंगाबादेत कुणी ओळखत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे कार्यकर्ते त्यांचं काम करतील असं वाटत नाही. मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, पण याबाबत मला मुंबईच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला होता पण मी त्यांना नकार कळवला. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी दोनच दिवसात औरंगाबाद लोकसभेबाबत निर्णय घेतील. जवळपास निर्णय होत आलाय दोन दिवसात याबाबत सगळं काही स्पष्ट होईल, अशी माहिती एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिली होती.
शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमध्ये औरंगाबादची जागा शिवसेनेकडे आहे. यावेळीही विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनाच शिवसेनेकडून तिकीट देण्यात येणार आहे. त्यामुळे खैरेंविरोधात आता जलील मैदानात असतील. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे. आघाडीकडून औरंगाबादसाठी उमेदवार अजून जाहीर झालेला नाही.