… म्हणून वंचितशी आघाडी तोडली : इम्तियाज जलील

| Updated on: Sep 07, 2019 | 5:27 PM

एमआयएमने (AIMIM) वंचित बहुजन आघाडीतून (VBA) बाहेर पडल्याचा निर्णय घेतल्यानंतर वंचितने एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी तसं काहीही सांगितलं नसल्याचं म्हटलं आहे.

... म्हणून वंचितशी आघाडी तोडली : इम्तियाज जलील
Follow us on

औरंगाबाद : एमआयएमने (AIMIM) वंचित बहुजन आघाडीतून (VBA) बाहेर पडल्याचा निर्णय घेतल्यानंतर वंचितने एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी तसं काहीही सांगितलं नसल्याचं म्हटलं. मात्र, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी युती तोडण्याचा निर्णय ओवैसी यांच्या सुचनेप्रमाणेच घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, “आम्हाला खूपच कमी जागा दिल्या जात होत्या. आम्ही बराच काळ वाट पाहिली. वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव दिला, मात्र आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या नाही. त्यामुळे अखेर आम्ही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.”

‘ओवैसींच्या सुचनेप्रमाणेच युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय’

युतीतून बाहेर पडल्यानंतर वंचित आघाडीकडून काही पातळीवर इम्तियाज जलील यांच्यावर टीकाही झाली. जलील यांनी ओवैसी यांच्याशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतल्याचाही आरोप करण्यात आला. तसेच हा निर्णय जलील यांचा असून आम्ही असदुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असंही वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आलं. मात्र, जलील यांनी वंचितचा हा दावा फेटाळला आहे.

‘ही भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका, मान्य करायची तर करा, नाही तर नाही’

इम्तियाज जलील म्हणाले, “असदुद्दीन ओवैसी यांना युतीबाबत मेल करण्यात आला होता. तो मेल मिळाल्यानंतर त्यांनी युतीबाबत काय भूमिका घ्याची याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यानंतर आम्ही तातडीने प्रसिद्धीपत्रक काढून आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली. ही भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका आहे. कुणाला मान्य करायची असेल तर करावी नसेल करायची तर करू नये.”

‘मी पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष, मला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार’

मी पक्षाचा लहान कार्यकर्ता असलो, तरी मी पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. माझ्या वरिष्ठांनी सांगितल्यानंतर मी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आता किती जागा लढवायच्या, पुन्हा आघाडी करायची की नाही करायची? याचा अंतिम निर्णय ओवैसीच घेतील, असंही जलील यांनी नमूद केलं.