औरंगाबाद : एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला कधीही 50 जागा मागितल्या नव्हत्या, आमची 76 जागांची मागणी होती. पण वंचितमध्ये काही संघाचे लोक घुसले का, की ज्यांनी आम्हाला एवढ्या जागा देऊ नये असं सांगितलं, असा सवाल एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel VBA) यांनी उपस्थित केलाय. प्रकाश आंबेडकरांचे उपकार कधीही विसरणार नाही, पण मुस्लीम चेहरा म्हणून प्रमोट करायचं आणि नंतर अस्तित्व नाकारायचं हे चालणार नाही. आम्हाला 40 ते 50 जागा दिल्यास आम्ही सोबत जाऊ, असंही जलील (Imtiyaz Jaleel VBA) म्हणाले.
वंचित बहुजन आघाडी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याविरोधात उभी केली होती. त्यांना काँग्रेससोबतच जायचं असेल तर ते अगोदर सांगायला हवं होतं, असंही इम्तियाज जलील म्हणाले. आमच्याकडे व्होट बँक नाही असं प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल, पण निवडणुकीत त्यांना दिसेलच, असा इशाराही त्यांनी दिलाय.
“मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न होतोय”
वंचितसोबत युती तोडण्याचा निर्णय हा इम्तियाज जलील यांचा असल्याचाही आरोप होतोय. यावरुन मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचं इम्तियाज जलील म्हणाले. अजूनही निर्णय व्हावा, अन्यथा उमेदवार मिळेल तिथे लढण्याची आमची तयारी आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे माझ्यासाठी गॉडफादर आहेत. त्यांनी सांगितलं तर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देईल आणि खासदारकीही सोडेल. त्यांचा मी आदर करतो. युती तोडण्याच्या अगोदर ओवेसी साहेबांना कळवलं होतं. मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत आठ जागा मान्य करणार नाही. उत्तर मिळत नसल्याने आम्ही मुलाखती घेऊन उमेदवार जाहीर करु, अशी माहिती जलील यांनी दिली.
“मंगळवार सायंकाळपर्यंत काही उमेदवार जाहीर होणार”
एमआयएम मंगळवारपासून मुलाखती सुरु करणार आहे. मालेगाव, पुणे, नांदेडसह इतर जागांसाठी मुलाखती होतील. मंगळवारी सायंकाळपर्यंत काही उमेदवार जाहीर करु, असंही इम्तियाज जलील म्हणाले.