औरंगाबाद : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी (Imtiyaz Jalil on Ayodhya Verdict) अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आहे, मात्र आमचे या निर्णयावर काही आक्षेप असल्याचं मत त्यांनी (Imtiyaz Jalil on Ayodhya Verdict) व्यक्त केलं. तसेच न्यायालयाने दिलेली 5 एकर जागा काँग्रेसला भेट देऊ. त्यांनी तिथं काँग्रेस भवन बांधावं, अशी कोपरखळी काँग्रेसला लगावली.
इम्तियाज जलील म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने संघी लोकं आज खुश असतील. काँग्रेसही खुश असणार. कारण काँग्रेसच्याच काळात हे सगळं सुरू झालं होतं. आम्ही न्यायालयाने देऊ केलेली 5 एकर जागा काँग्रेसला भेट देऊ. त्यांनी या जमिनीवर काँग्रेस भवन बांधावं. जेणेकरून त्यांना हा वाद सुरू केल्याची आठवण राहील.”
आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. पण या निर्णयावर आमचे काही आक्षेपही आहेत. आम्ही 5 एकर जागेसाठी लढलो नाही. आमचा लढा न्यायासाठी होता. आम्हाला कुणाचीही खैरात नको आहे. देशातील कुणत्याही मुसलमानाला पाच एकर जागा नको आहे. मशीद बांधण्यासाठी आम्ही पैसे जमवून जागा विकत घेऊ शकतो आणि आम्ही घेणार, असंही जलील यांनी नमूद केलं.
“सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे, अंतिम नाही”
सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे, मात्र अंतिम नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल न्यायाला धरून नाही. आम्हाला या निर्णयाला विरोध दर्शवण्याचा अधिकार आहे. न्यायाधीश जे. एस. वर्मा यांचा याला आधार आहे, असंही मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं.
“मशिद पाडणाऱ्यांना अजूनही शिक्षा का नाही?”
इम्तियाज जलील यांनी न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त करतानाच बाबरी मशिद पाडणाऱ्यांना अजूनही शिक्षा का झाली नाही, असाही सवाल केला. ते म्हणाले, “संजय राऊत यांच्यासारखे अनेक लोक छातीठोकपणे आम्ही मशिद पाडल्याचं सांगतात. तरिही त्यांच्यावर कारवाई होत नाही. ज्यांनी मशिद पाडली त्यांना अजूनही शिक्षा का झालेली नाही? बहुसंख्य असणाऱ्यांच्या बाजूने निकाल लागणार असेल, तर उपयोग काय?”
मुस्लिम लॉ पर्सनल बोर्ड जो निर्णय घेईन तो आम्हाला मान्य असेल, असंही जलील यांनी सांगितलं. जे व्हायचं ते झालं. आता देशातील सर्व धार्मिक स्थळं जसे आहेत तशा स्थितीत कायम ठेवण्यासाठी एक कायदा आणावा. अन्यथा सर्वत्र अशाच पद्धतीने वाद निर्माण होतील, अशी शंकाही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. यावेळी जलील यांनी न्याय व्यवस्थेचा आदर करत कुठेही आंदोलन न करणाऱ्या देशातील मुस्लिमांचे आभार मानले.