Assembly elections 2023 | देशात पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. 3 डिसेंबरला मतदान पेट्या उघडतील आणि नवीन सरकारचा निर्णय होईल. जसा जसा मतदान निकालाचा दिवस जवळ येत आहे तसे तशा लोकांच्या अपेक्षा उंचावल्या जात आहेत. कारण, या निवडणुकीत देण्यात आलेले आश्वासन. तेलंगणा, मिझोराम, छत्तीसगड या राज्यात काँग्रेस भाजपसह तिसऱ्या आघाडीने लोकांना एक आश्वासन दिलंय. ते आश्वासन आहे कमी किमतीत सिलिंडर देण्याचं. त्यामुळेच सरकार कुणाचंही आलं तरी लोकांना मात्र स्वस्तात सिलिंडर मिळणार याची पूर्ण आशा लागून राहिली आहे.
काँग्रेसने या निवडणुकीत छत्तीसगडमध्ये सिलिंडरवर 500 रुपयांची सबसिडी देण्याची घोषणा करताच भाजपनेही प्रत्येक गरीब कुटुंबाला 500 रुपयांना सिलिंडर देण्याची घोषणा केली. मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या भाजप सरकारने 450 रुपयांना सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. तर, काँग्रेसने 500 रुपयांना सिलिंडर देण्याची घोषणा केलीय. राजस्थानमध्ये काँग्रेसने गरीब महिलांना 400 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली. तेलंगणा आणि मिझोराममध्येही काँग्रेस, भाजपसह तिसऱ्या आघाडीने कमी किमतीत सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे.
छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गरीब कुटुंबाला 500 रुपयांना सिलिंडर देण्याची घोषणा केली. त्यावरून राजकारण सुरु झाले. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मोदी यांच्या या घोषणेवरून प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत. मग ते राज्यांतील लोकांशी भेदभाव कसा करू शकतात? मोदी जर हमी देत असतील तर त्यांनी देशभरात 450 रुपयांना सिलिंडर द्यावा. मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशवासीय महागाईने त्रस्त आहेत, हे त्यांनीच मान्य केले आहे अशी टीका बघेल यांनी केली. मुख्यमंत्री बघेल यांच्या या टीकेला रायपूरचे खासदार सुनील सोनी यांनी उत्तर देताना छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार बनताच गरीब वर्गातील कुटुंबांना स्वस्त सिलिंडर मिळेल अशी हमी दिली.
मात्र, या निवडणुकीमध्ये महागड्या गॅस सिलिंडरमधून निघणाऱ्या उष्णतेचा परिणाम लोकसभा निवडणुकीवरही दिसणार आहे. लोकसभेतही हाच मुद्दा हाती घेऊन काँग्रेस भाजपला घेरण्याची चिन्हे आहेत. तर, केंद्रातील मोदी सरकारने याआधीच सिलिंडरच्या किमतीबाबत मोठा निर्णय घेत कॉंग्रसला धक्का दिलाय. पाच राज्यांतील निवडणुकांपूर्वीच केंद्र सरकारने २९ ऑगस्टला गॅस सिलिंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी केल्या होत्या.
छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या देशातील पाच राज्यांतील निवडणूक प्रक्रिया झाली. 3 डिसेंबरला नव्या सरकारची दिशा ठरेल. त्यानंतर सत्तेत येणाऱ्या पक्षांनी केलेल्या त्यांच्या घोषणांची अंमलबजावणी केल्यास जनतेला स्वस्त सिलिंडर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळेच लोकाचे लक्ष आता निवडणूक निकालाकडे लागले आहे.
छत्तीसगड : काँग्रेसने महिलांच्या खात्यात गॅस सिलिंडरवर 500 रुपये सबसिडी देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच गॅस सिलिंडरची किंमत 1000 रुपये असेल तर काँग्रेस 500 रुपये सबसिडी देणार. तर, भाजपने प्रत्येक गरीब कुटुंबाला ५०० रुपयांना स्वस्त गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजे भाजप ही सुविधा फक्त गरिबांनाच देणार आहे.
मध्य प्रदेश : येथे भाजपने 450 रुपयांना आणि काँग्रेसने 500 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. इथे भाजपचा सिलिंडर काँग्रेसच्या तुलनेत 50 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.
तेलंगणा : BRS ने 400 रुपयात, काँग्रेसने 500 रुपयात आणि भाजपने उज्ज्वला गॅस कनेक्शनधारकांना वर्षभरात चार मोफत सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे.
राजस्थान : येथे काँग्रेसने गरीब महिलांना 400 रुपयांना तर भाजपने गरीब महिलांना 450 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केलीय.
मिझोरम : राज्यात काँग्रेसने 750 रुपयांना सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. तर भाजपने स्वस्त सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, किती किमत ते जाहीर केले नाही.