मुंबई : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. ईशान्य भारतात हातात असलेलं एकमेव राज्य गमावलं असलं तरी हिंदी भाषिक तीन राज्यांमध्ये काँग्रेसने भाजपला चितपट केलंय. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही तीन राज्य काँग्रेसने भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतली आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवलंय, तर मध्य प्रदेशात इतर पक्षांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर मध्य प्रदेशातील चित्रही स्पष्ट झालंय.
मध्य प्रदेशात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतापासून दूर आहे. शिवाय भाजपच्या तुलनेत काँग्रेसला मतंही कमी मिळाली आहेत. पण कमी मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवारांचा विजय झाल्यामुळे भाजपचं चौथ्यांदा सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न भंगलं. काँग्रेसला 40.9 टक्के मतदारांनी मतदान केलंय, तर भाजपला 41 टक्के मतदारांनी पसंती दिली. विशेष म्हणजे मध्य प्रदेशात नोटा (None of the above) या पर्यायाला 1.4 टक्के मतं मिळाली आहेत.
भाजपला मध्य प्रदेशात 15642980 मतदारांनी पसंती दिली. तर काँग्रेसला 15595153 मतं मिळाली. म्हणजेच भाजपच्या तुलनेत काँग्रेसला 47 हजार 827 मतं कमी मिळाली. विशेष म्हणजे नोटा या पर्यायाला 5 लाख 42 हजार 295 मतदारांनी पसंती दिली. म्हणजेच मध्य प्रदेशातील 1.4 टक्के मतदारांनी एकाही उमेदवाराला मत दिलं नाही.
नोटाची मतं भाजपसाठी धोकादायक ठरली आहेत. कारण, भाजपच्या बहुतांश उमेदवारांचा अत्यंत कमी मताने पराभव झालाय. नोटांचा आकडा कमालीचा वाढलाय. त्यामुळे भाजपचा नोटाने घात केलाय असं म्हणता येईल.
राजस्थान, छत्तीसगडमधील चित्र
राजस्थानमध्ये भाजपच्या 99 जागा निवडून आल्या आहेत. बहुमतासाठी फक्त एका जागेची गरज आहे, ती गरज बसपाकडून पूर्ण होणार आहे. इथे काँग्रेसला 39.3 टक्के (13935201), तर भाजपला 38.8 टक्के (13757502) मतं मिळाली आहेत. म्हणजेच भाजप आणि काँग्रेस यांच्यात 177699 मतांचा फरक आहे. नोटा पर्यायाला 1.3 टक्के म्हणजे 4 लाख 67 हजार 781 मतं मिळाली.
छत्तीसगडमध्ये भाजपने सपाटून मार खाल्लाय. जागा तर अत्यंत कमी निवडून आल्या आहेतच, शिवाय मतांचा टक्काही कमालीचा घसरलाय. इथे काँग्रेसने 43 टक्के मतं मिळवली आहेत. तर भाजपला 33 टक्के मतं मिळाली. नोटा पर्यायाला तब्बल दोन टक्के म्हणजेच 282744 मतं मिळाली आहेत.