मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष तोडून भाजपाने सत्तेची बेगमी केली आहे. परंतू भाजपाचे ग्राऊंड लेव्हलचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या पचनी ही महायुती पडलेली नाही. कल्याण येथील घटना इतर ठिकाणी देखील घडू शकतात असे म्हटले जात आहे. भाजपाचे कट्टर कार्यकर्त्यांनी या महायुतीपासून फारकत घेतली आहे. भाजपाला या लोकसभा निवडणूकांमध्ये कार्यकर्त्यांमधील या बेबनावाचा सामना करावा लागू शकतो असे म्हटले जात आहे.
महाराष्ट्रात आधी शिवसेना पक्ष फोडून भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या सोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर बहुमत असताना शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडून त्यांनाही सोबत घेतले. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना या सत्तेचे सुख जरी मिळाले असले तरी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी या युतीपासून नाराज आहेत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलेले सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना आवडलेले नाही. त्यातच अजित पवार यांच्याशी भाजपा कार्यकर्त्यांची विचारधाराही जुळत नसल्याने या महायुतीला भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांनी नाकारले आहे.
कल्याण येथील गोळीबाराची घटना ही हिमनगाचे तरंगते टोक असल्याचे म्हटले जात आहे. आतून भाजपा कार्यकर्त्यांना ही महायुती काही पचनी पडलेली नाही. उल्हासनगरातील हिललाईन पोलिस ठाण्यातील गोळीबार अचानक घडलेला नाही. शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत वाद अनेक महिन्यांपासून सुरु आहे. एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी अनेकदा कार्यकर्त्यांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याचा शेवट रक्तरंजित संघर्षात झालेला दिसत आहेत. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दडपशाहीला कंटाळून हा गोळीबार केल्याचा आरोप कोर्टात केला आहे.
रायगड जिल्ह्यातही भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. रविवारी पेणच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली आहे. तटकरे यांना पुन्हा लोकसभेचे तिकीट देण्यास भाजपाच्या कार्यकर्त्यांचा विरोध आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अजित पवार यांच्या खासदारांचे आणि आमदारांचे वर्चस्व असलेल्या मतदार संघात भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कोकणातही शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजपाचा संघर्ष सुरु आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही भाजपाचे सर्वसामान्य कार्यकर्ते संधीची वाट पाहात आहेत. ते शिंदे आणि पवार यांच्या कार्यकर्त्यांसोबत मिसळू शकत नसल्याचे म्हटले जात आहे. दबक्या आवाजात भाजपाचे सामान्य कार्यकर्ते आता या युतीबद्दल बोलू लागले आहेत. मंत्री आणि नेत्यांपुढे ते बोलत नसले तरी ही अंतर्गत धुसफूस भाजपाला लोकसभेच्या निवडणूकांत भारी पडणार असल्याचे म्हटले जात आहे.