नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा (NCP Pariwar Sanvad yatra) पक्षाला फायद्यात पडताना दिसून येत आहे. नागपूर शहरातील तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकंदरितच संवाद यात्रेतील ‘संवाद’ राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडताना दिसून येत आहे. (In nagpur 3 Carporator Meet NCP Jayant Patil)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा सुरु आहे. या यात्रेचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु झालाय. प्रदेशाध्यश्र जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादीची यंग ब्रिगेड विदर्भ दौऱ्यावर होती. यावेळी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठींचा कार्यक्रम पार पडला. याच दौऱ्यात शहरातील तीन नगरसेवकांनी जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. आभा पांडे, सतीश होले आणि मोहम्मद जमाल या नगरसेवकांनी जयंत पाटील यांची भेट घेतलीय.
आभा पांडे (Abha Pandey) या मुळात काँग्रेसच्या आहेत. नागपूर महापालिकेत त्या स्थायी समितीच्या अध्यक्ष होत्या. चार नगरसेवकांच्या प्रभागात त्या एकट्याच अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. यावरुन आभा पांडे यांच्या ताकदीचा अंदाज येतो. मागील काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. मात्र स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा भाजपप्रवेश होऊ शकला नाही
सतिश होले (satish Hole) यांनाही पक्षांतराचा बराच अनुभव आहे. त्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नंतर अपक्ष आणि नंतर भाजप असा प्रवास केला आहे. त्यांना जेव्हा काँग्रेसने उमेदवारी नाकारली तेव्हा त्यांनी अपक्ष निवडून येत काँग्रेसला आपली ताकद दाखवून दिली. मग त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र स्वपक्षियाच्या विरोधात त्यांनी बंड केल्याने भाजपमधून त्यांना निलंबित करण्यात आलं.
उत्तर नागपूरमधील बहुजन समाज पार्टीचे काही नगरसेवक नाराज असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची संबंधित नाराज नगरसेवकांनी भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि जनता ही केंद्रबिंदू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने अभिप्राय अभियान राबवून डिजीटल मोहीम सुरु केली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी हा कार्यक्रम सुरु आहे. या यात्रेला येत्या 28 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.
“गडचिरोलीतील अहेरीपासून ही परिवार संवाद यात्रा सुरु झाली आहे. या यात्रेतील पहिला टप्पा हा 17 दिवस असणार आहे. त्यात संपूर्ण विदर्भ आणि खानदेश असे 14 जिल्हे आणि 42 मतदारसंघाचा आढावा घेऊ. ही यात्रा 13 फेब्रुवारीला संपेल. जवळपास 3 हजार किलोमीटरचा प्रवास राष्ट्रवादी पक्षाकडून केला जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि खान्देशात दौरा असेल. गडचिरोली, चंद्रपूर , भंडारा,वर्धा, अमरावती, जळगाव, धुळे, नंदूरबार, नागपूर, नांदेड इत्यादी 14 जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जातील. या यात्रेदरम्यान लोकांच्या समस्या जाणून घेऊ. तसेच विदर्भ आणि खानदेशातील मतदारसंघाचा आढावाही घेऊ,” असेही जयंत पाटील म्हणाले.
“त्याशिवाय 20 आणि 30 फेब्रुवारी दरम्यान मराठवाड्यातील दुसरा टप्पा जाहीर करु. तसेच उरलेले इतर टप्पे विधानसभा अधिवेशनानंतर जाहीर करु,” असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
हे ही वाचा :
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या हालचालींना वेग, नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार
न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हा सुद्धा तिरंग्याचा अपमान, सामनातून मोदींवर टीका