शिर्डी : दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधामुळे (Corona Restriction) देशातलं श्रीमंत देवस्थाने ही बंद होती. त्यामुळे अनेक भक्तांना आपल्या देवाचे दर्शन घेता आले नव्हते. असेच काहीसे शिर्डीच्या साईबाबा मंदिराबाबत (Saibaba Temple) घडलं होतं. येथे कोरोनामुळे साईमंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलं होतं. मात्र साई मंदिर ऑक्टोबर 2021 मध्ये खुले झाले. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात साईंच्या झोळीत तब्बल 188 कोटींपेक्षा जास्त विक्रमी दान (Donation) जमा झाले आहे. शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी ही अधिकृत आकडेवारी दिली. त्याच बरोबर मंदिर खुले झाल्यानंतर सात महिन्यात 64 लाख भाविकांनी शिर्डीला येत साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरवर्षी जगभरातून लाखो भाविक शिर्डीत येत असतात. हे भाविक साईंच्या चरणी कोट्यवधींचं दान देतात. दानपेटीत पैसे, सोने, नाने, हिरे-मोती चांदिच्या वस्तूंनी भरून जाते. त्यामुळे शिर्डी संस्थानच्या खजिन्यात प्रतिवर्षी वाढ होत असते. शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधून भाविक प्रचंड संख्याने येत असतात. तर ते आपल्या मुक्तहस्तानं दान करतात. त्याप्रमाणे आर्थिक वर्ष संपताना दानपेटीमध्ये जमा झालेले पैसे आणि दानात मिळालेल्या संपत्तीची मोजदाद करून त्याचा ताळेबंद सादर केला जातो.
त्याप्रमाणे साईबाबांच्या दर्शनासाठी याही वर्षी लाखो भाविक शिर्डीत आले. कोरोना महामारीनंतर साईमंदिर सुरू झाल्यापासून गेल्या सात महिन्यांत साई भक्तांनी बाबांच्या झोळीत भरभरून दान दिले. तर 7 ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या सात महिन्यांत एकूण 188 कोटी 55 लाख रुपये साईंच्या तिजोरीत जमा झाले आहेत. तर गेल्या सात महिन्यात 64 लाख भाविकांनी शिर्डीला येत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले आहे. त्यांनी बाबांच्या दरबारात रुपये-पैसे, सोने -चांदी आणि इतर अनेक मौल्यवान वस्तूंचे दान केले.
कोविड काळात लॉकडाऊनमुळे शिर्डीचे अर्थचक्र पूर्णतः थांबले होते. परंतु कोविड काळानंतर साई मंदीर सुरू झाल्याने देशभरातील साई भक्त शिर्डीत येत आहेत. त्यामुळे शिर्डीचे अर्थचक्र पुन्हा सुरळीत झाले आहे.
-भाग्यश्री बानायत