बारामती : गेल्या काही महिन्यांपासून इंदापूरच्या उमेदवारीवरून तापलेलं राजकीय वातावरण हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर शांत झालं. मात्र आता राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Indapur dattatray bharane) यांना उमेदवारी देण्यावरून नवीन वादाला सुरुवात झाली आहे. इंदापूरमधून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक नेत्यांनी मेळावा घेत भरणे (Indapur dattatray bharane) यांना उमेदवारी न देण्याची मागणी केली. त्यामुळे उमेदवारी कुणाला द्यायची यावरून पक्षाचे नेते अजित पवार यांच्या डोकेदुखीत वाढ होणार आहे.
2014 नंतर इंदापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तणाव
2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे जागा लढवली. इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. तेव्हापासून इंदापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीत संघर्ष पाहायला मिळाला.
लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी केली. त्यांना विधानसभेसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरवलं. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीने फसवल्याचं सांगत भाजपमध्ये प्रवेश केला.
जुन्या कार्यकर्त्यांकडून बंडाचा इशारा
परिणामी इंदापूरची जागा आता राष्ट्रवादीकडेच राहणार यावर शिक्कामोर्तब झालंय. असं असलं तरी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील आप्पासाहेब जगदाळे, अशोक घोगरे, भाऊसाहेब सपकाळ या बड्या नेत्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
सध्या विधानसभेसाठी इंदापूर बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे हे प्रमुख दावेदार आहेत. 2014 मध्ये संधी असतानाही आपण विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासाठी काम केलं. मात्र आता आपल्याला संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास आपण वेगळा विचार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
राष्ट्रवादीकडून आमदार दत्तात्रय भरणे यांनी आतापर्यंत कारखाना, जिल्हा बँक, जिल्हा परिषद अशा सर्वच महत्वांच्या पदांवर काम केलंय. त्यामुळे साहजिकच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना संधी मिळालेली नाही.. त्याचवेळी विद्यमान आमदारांनी आपल्या पदाच्या माध्यमातून स्वतःचाच गट निर्माण केलाय.. त्यामुळं आम्ही त्यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं सांगत ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक घोगरे यांनी त्यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली.
गेल्या दहा वर्षांपासून विद्यमान आमदारांना आम्ही सर्वानीच साथ दिली. त्यामुळं त्यांनी आता इतर इच्छुकांनाही संधी देण्यासाठी आमदारांनी पुढं यावं आणि पक्षाने यापुढे एक व्यक्ती, एक पद यानुसार कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी भाऊसाहेब सपकाळ यांनी केली.
इंदापूरच्या जागेवरून आघाडीतला वाद हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर संपलेला असताना आता विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यावरून राष्ट्रवादीतूनच विरोध होऊ लागलाय. पक्षाने दत्तात्रय भरणे यांना आतापर्यंत अनेक पदांवर संधी दिली. मात्र आता कुठेतरी खांदेपालट व्हायला हवा अशीच भूमिका इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे.