Devendra Bhuyar : राज्याच्या इतिहासातील एक नंबरचा होपलेस आणि बोगस राज्यपाल; देवेंद्र भुयार यांचा तोल सुटला

| Updated on: Jul 04, 2022 | 4:41 PM

Devendra Bhuyar : लोकसभा निवडणुकीपासूनच मी महाविकास आघाडीसोबत होतो. याचे सर्वच साक्षी आहेत. एखाद्यावेळी त्यांचा उमेदवार त्यांच्याच कर्माने पडला. त्यामुळे संजय राऊत यांनी आमच्याकडे बोट दाखवणं हे चुकीचं आहे.

Devendra Bhuyar :  राज्याच्या इतिहासातील एक नंबरचा होपलेस आणि बोगस राज्यपाल; देवेंद्र भुयार यांचा तोल सुटला
राज्याच्या इतिहासातील एक नंबरचा होपलेस आणि बोगस राज्यपाल; देवेंद्र भुयार यांचा तोल सुटला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीला (ncp) पाठिंबा देणारे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्याबाबत बोलताना तोल ढासळला. या राज्याच्या इतिहासातील एक नंबरचा होपलेस आणि बोगस राज्यपाल या राज्याला भेटला आहे. हे मी जाहीर सांगतो. आतापर्यंत जेवढे राज्यपाल झाले त्यांनी कधी पक्षनिष्ठा, धर्म, जात, पंथ पाहिला नाही. सर्वांना समान न्याय दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात काम करणारा माणूस हा व्यापक दृष्टीकोण ठेवून असणारा असला पाहिजे. पण तसं न होता विशिष्ट पक्षाचं धोरण राबवणं राज्यपालांना शोभा देत नाही. मिनी मंत्रालय राज्यपालांनी सुरू केलं आहे. ते फार चुकीचं आहे. त्यामुळे एक नंबरचा होपलेस राज्यपाल या राज्याला मिळाला आहे, अशी टीका देवेंद्र भुयार यांनी केली. ते टीव्ही9 शी बोलत होते. देवेंद्र भुयार यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या विधानाप्रकणी प्रतिक्रियाही उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीपासूनच मी महाविकास आघाडीसोबत होतो. याचे सर्वच साक्षी आहेत. एखाद्यावेळी त्यांचा उमेदवार त्यांच्याच कर्माने पडला. त्यामुळे संजय राऊत यांनी आमच्याकडे बोट दाखवणं हे चुकीचं आहे. त्यांचे परिणाम राऊतांच्या वागण्यामुळे भोगावे लागले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला 164 आणि शिवसेनेला 107 मते मिळाली. त्याचा हा परिणाम आहे. आधी माणूस तपासायचा नाही आणि त्याच्यावर टीका करायची. त्यामुळे हे परिणाम भोगावे लागले, अशी टीका शिवसेनेवर करतानाच मी आघाडीसोबतच आहे, असंही देवेंद्र भुयार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

लग्नाच्या बोहल्यावर चढणार

दरम्यान, देवेंद्र भुयार हे लग्न करणार आहेत. त्यांच्या हातालाही मेहंदी लागली होती. त्याबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्यांनीही त्याला दुजोरा दिला. अडीच वर्षापासून विधानसभा सदस्य म्हणून मी काम करत आहे. कुटुंबाला वेळ दिला नव्हता. आता सरकार बनवण्याचं ठरवलं. तसेच संसारही थाटण्याचा इरादा आहे. त्यामुळे लग्नाचं ठरवलं आहे. त्याचीच मेहंदी लावली आहे. पहिलं आपलं सरकार स्थापन करू नंतर राज्याचं बघू, असं ते म्हणाले.

प्रत्येक निवडणुकीत आघाडीसोबतच

मी राष्ट्रवादीसोबत आहे. आघाडीसोबत आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक असो की विश्वासदर्शक ठराव असो. मी प्रत्येक निवडणुकीत आघाडीसोबतच राहणार आहे. त्यामुळे मी इतरांसोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव झाला. साळवी यांना केवळ 107 मते पडली. तर भाजपच्या राहुल नार्वेकर यांना 164 मते पडली. तर समाजवादी पार्टी आणि एमआयएमचे तीन आमदार तटस्थ राहिले. या निवडणुकीत राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत.