मुंबई : भाजप आणि शिंदे गटाचं नेमकं काय होणार याकडं सर्वांच लक्ष लागलंय. यात आता इंडिया टुडे (India Today) आणि सी वोटरच्या (C Voter) सर्व्हेवरून राजकीय घमासान सुरू झालंय. पुढच्या वर्षा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीचा मोठा फायदा तर, भाजप-शिंदे यांची चिंता वाढविणारी आकडेवारी यातून समोर आली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये भाजपसह शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली आहे. भाजप-शिंद गट आणि आरपीआयला फक्त १४ जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीचे तब्बल ३४ खासदार निवडून येऊ शकतात.
२०१९ मध्ये महायुतीचे ४१ खासदार निवडून आले होते. त्यापैकी शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. पण, आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. आगामी निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला फक्त १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ भाजपला २७ जागांवर फटका बसू शकतो.
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५, तर काँग्रेसचा केवळ १ खासदार महाराष्ट्रातून निवडून गेला. महाविकास आघाडीचे सहा खासदार जिंकले होते. पण, यावेळी महाविकास आघाडीला २८ जागांचा फायदा होईल, असा अंदाज आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातली जनता आता निवडणुकांची वाट बघते. सर्व्हेनुसार आता निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला किमान ३४ जागा मिळतील. महाविकास आघाडी घट्ट राहिली, तर कमीतकमी ४० जागा जिंकू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिलं की, चार-सहा जागा राखल्या तरी त्यांचं मोठं काम होईल. आघाडी होईल, असं गृहित धरून दिशा बांधणं हे दिशाभूल करणे आहे. राजकारणात निवडणुकांच्या गणितात दोन आणि दोन चार कधीच होत नाही. मायनस किती होतील, हे येणारा काळ ठरवेल, असंही शिंदे म्हणाले.