अहमदाबाद : भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. काल (3 मार्च) गुजरातचे कृषिमंत्री आर. सी. फलदू आणि खासदार पूनम माडम यांच्या उपस्थितीत तिने पक्षात प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार, खेळाडू किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत. नुकतेच अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने भाजपात, तर अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीआधी जाडेजाची पत्नी रिवाबा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर तिने भाजपमध्ये प्रवेश केला. रिवाबा जाडेजा काही महिन्यांपूर्वी राजस्थानातील संघटना असलेल्या करणी सेनेसोबत काम करत होती.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये रिवाबा करणी सेनेच्या महिला विंगची अध्यक्ष म्हणून काम पाहत होती. करणी सेनेत सहभागी झाल्याबद्दल तीने आनंद व्यक्त केला होता. त्या दरम्यान राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता, यावर अजून काही निर्णय घेतलेला नाही, असे रिवाबा हिने सांगितले. मात्र समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा यावेळी रिवाबाने व्यक्त केली.
रिवाबा जाडेजाने दिल्लीमधून मॅकेनिकल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतलं आहे. तिला प्रशासकीय सेवेत जायचे होते. मात्र लग्न आणि मुलांच्या जबाबदारीमुळे ती यूपीएससी परीक्षा देऊ शकली नाही. रवींद्र जाडेजाने 17 एप्रिल 2016 ला रिवाबासोबत लग्न केलं. यानंतर जून 2017 मध्ये रवींद्र आणि रिवाबाला मुलगी झाली.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधीच पक्षात प्रवेश
रिवाबा जाडेजाने पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गुजरातमध्ये जाणार आहेत. सोमवारी ते जामनगर येथे पोहचणार आहेत. तसेच जामनगर येथे मोदी एका जनसभेसाठी उपस्थित राहणार आहेत. यासोबतच पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थिती लावणार आहेत. यानंतर मोदी अहमदाबाद मेट्रो ट्रेनची सुरुवात करणार आहेत.