Inflation Effect : भररस्त्यात चुलीवर भाकरी थापल्या, राष्ट्रवादीचे आंदोलन; भाजलेल्या भाकरी पंतप्रधान मोदींना पोस्टाने पाठवल्या!

| Updated on: May 16, 2022 | 12:27 AM

महिलांनी बाजारात जाऊन शेतकरी व सामान्य नागरिक यांची भाव वाढ बाबत विचारपूस करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला विभागीय अध्यक्ष वैशाली राहुल मोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

Inflation Effect : भररस्त्यात चुलीवर भाकरी थापल्या, राष्ट्रवादीचे आंदोलन; भाजलेल्या भाकरी पंतप्रधान मोदींना पोस्टाने पाठवल्या!
उस्मानाबादेत महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
Image Credit source: TV9
Follow us on

उस्मानाबाद : वाढत्या महागाईच्या (Inflation) निषेधार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करीत मोदी सरकारचा (Modi Government) निषेध करण्यात आला. पेट्रोल, डिझेल, गॅस, भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने महिलांनी टाळ वाजवीत मोर्चा काढला व जोरदार घोषणाबाजी केली. महागाई वाढल्याने महिलांनी भर चौकात चुल मांडली व त्यावर भाकरी तयार केल्या या भाजलेल्या भाकरी या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पोस्टाने पाठविण्यात येणार आहेत. यावेळी गॅस दर वाढल्याने गॅसला हार घालण्यात आला व निषेध व्यक्त करण्यात आला. महिलांनी बाजारात जाऊन शेतकरी व सामान्य नागरिक यांची भाव वाढ बाबत विचारपूस करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला विभागीय अध्यक्ष वैशाली राहुल मोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

भररस्त्यात चुलीवर भाकरी थापल्या

आंदोलक महिलांनी यावेळी वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू मंहगा तेल…, मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय…, अशा केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. घरगुती वापराच्या व सीएनजी गॅस सिलिंडरचे दर खूपच वाढले आहेत. रोज वापर होणाऱ्या पेट्रोल -डिझेलच्या वाढत्या किमतीही हैराण करणाऱ्या आहेत. देशातील वाढणारी महागाई व बेरोजगारीमुळे तरुणाचे जीवन जगणे कठीण झाले आहे. इंधन दरवाढीमुळे गृहिणींवर आज पारंपरिक पद्धतीने लाकूड फाटा व गवरीवर स्वयंपाक करण्याची वेळ ग्रामीण भागात आली आहे. याचा निषेध म्हणून परंडा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसने चुलीवर भाकरी केल्या.

उस्मानाबादेत महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वैशाली मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर, नगराध्यक्ष जाकीर सौदागर, महिला जिल्हाध्यक्षा मनिषा राखुंडे, युवती जिल्हाध्यक्षा स्वाती ध्रुवकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सौ. श्वेता सागर दुरुगकर, युवती जिल्हा कार्याध्यक्ष संगीता काळे यांनी महागाई विरोधात भाषणे करून निषेध केला. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देत गॅस दरवाढीचा आणि महागाईचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

केतकी चितळेच्या फोटोलाही जोडे मारले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या व्यक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने तिच्या फोटोला शाई फासून जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.