नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्लीतील रोज एवेन्यू कोर्टाने माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P Chidambaram Tihar Jail) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चिदंबरम (P Chidambaram Tihar Jail) यांना 19 सप्टेंबरपर्यंत तुरुंगात रहावं लागणार आहे. चिदंबरम यांनी तुरुंगात स्पेशल सेलची मागणी केली. शिवाय आपल्याला झेड सिक्युरिटी देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी वकिलामार्फत केली.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी चिदंबरम यांना सुरक्षा व्यवस्था दिली जाईल, याबाबत कोर्टाला आश्वस्त केलं. चिदंबरम यांची झेड सिक्युरिटी लक्षात घेता त्यांना तुरुंगातील स्पेशल सेलमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चिदंबरम यांना तुरुंगात औषधं आणि वेस्टर्न टॉयलेट पुरवण्यात यावं, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.
सीबीआय कोठडी संपल्यानंतर चिदंबरम यांना कोर्टात हजर करण्यात आलं. चिदंबरम हे एक शक्तीशाली नेता असल्यामुळे त्यांना सोडण्यात येऊ नये, अशी मागणी सीबीआयकडून कोर्टात करण्यात आली.
चिदंबरम यांची बाजू मांडत असलेले ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयीन कोठडीचा तीव्र विरोध केला. चिदंबरम यांच्यावर तपासात अडथळा निर्माण केल्याचा किंवा तपासावर काही परिणाम झाल्याचा कोणताही आरोप नाही, असा युक्तिवाद चिदंबरम यांनी केला. सोबतच आयएनएक्स मीडिया प्रकरणात ईडीच्या ताब्यात जाण्यासाठी चिदंबरम तयार असल्याचंही कपिल सिब्बल यांच्याकडून सांगण्यात आलं.
यानंतर काही तासातच चिदंबरम यांनी त्यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंटला आव्हान देणारी याचिकाही मागे घेतली. अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर चिदंबरम यांना सीबीआयच्या कोठडीत पाठवण्यात आलं होतं. विशेष न्यायालयाने चिदंबरम यांना पाच टप्प्यांमध्ये 15 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. 21 ऑगस्टला रात्री चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती.