नवी दिल्ली : महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि वाद हे जणू समीकरणच झालं आहे. त्यांची भूमिका कायम वादात राहिली आहे. आज 16 आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निकाल सुनावताना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्यपालांच्या भूमिकेचे पिसं काढली. राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आसूड ओढला. राज्यपालांच्या एकूणच भूमिकेवर नाराजी व्यक्त करत त्यांचे सर्वच निर्णय चुकल्याच दणका सुप्रीम कोर्टाने दिला. महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते समाजकारणातही माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका कायम वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्यांच्या काही वक्तव्यांमुळे तर शिंदे-भाजप सरकारची पण डोकेदुखी वाढली होती. बेताल वक्तव्यामुळे राज्यपालांनी अनेकदा वाद ओढावून घेतले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयानेच कडक शब्दात त्यांची हजेरी घेतली.
सुप्रीम बोल
राज्यपालांचे सर्व निर्णय चुकल्याचे सुप्रीम कोर्टाने सुनावले. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने 16 आमदारांच्या अपात्रतेविषयीच्या निकालाचे आज, 11 मे रोजी वाचन केले. त्यात राज्यपालांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेण्यात आला. राज्यपालाची भूमिका सुप्रीम कोर्टाने चांगलीच कानउघडणी केली. न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
हे तर मुळात त्यांचे कामच नाही
राज्यपालांनी कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणं चुकीचं आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावायला नको होती. कारण राज्यपालांकडे त्यावेळी बहुमत चाचणीसाठीचे पुरेसे कारण नव्हते, अशी कानउघडणी सुप्रीम कोर्टाने केली. आमदारांच्या जीवाला धोका असणे म्हणजे सरकार अल्पमतात आहे, असा त्याचा अर्थ होत नसल्याचे स्पष्ट करत, एकूणच राज्यपालांची भूमिका वादात सापडली आहे.
गेल्यावेळी फटकारले
मार्च महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी पण राज्यपालांच्या भूमिकेवरुन सुप्रीम कोर्टाने चांगलाच डोस दिला होता. राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने कडक टिप्पणी केली होती. राज्यपालांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करताना सजग राहणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. तसेच राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.
विरोधकांचे तोंडसूख
राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भूमिका कायम वादात होती. त्यांचे अनेक वक्तव्य वादाचे धनी झाले. त्यांची भूमिका कायम वादात राहिली. थोर पुरुषांविषयीच्या त्यांच्या दाखल्यांमुळे जनतेतून पण टिका झाली. त्यांच्या भूमिकेवर विरोधकांनी वेळोवेळी तोंडसूख घेतले होते. राज्यपालांच्या बेताल वक्तव्यामुळे राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी पण नाराजी व्यक्त केली होती.
संत्तातर नाट्य
राज्याच्या राजकीय इतिहासात 21 जून 2022 रोजी सत्तांतर नाट्य घडले होते. एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह सुरत गेले. त्यानंतर गुवाहाटीत पोहचले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक आमदारांनी गुवाहाटी जवळ केली. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. शिंदे यांनी 40 आमदारांसह भाजपसोबत राज्याच्या सत्ता हस्तगत केली.