मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील चारही टप्प्यातील मतदान पार पडलंय. पण निकालासाठी 23 मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. निकालासाठी आतूर असलेले कार्यकर्ते आकड्यांची जुळवाजुळव करुन आपला उमेदवार कसा विजयी होईल हे पटवून देत आहे. राज्यातील गावोगावी हे वातावरण दिसून येत आहे. तर याबाबतचे मेसेजही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
माझी निवडणूक आयोगला एक विनंती आहे.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचा निकाल लवकर जाहीर करावा.
इथे आकडेमोड करून सर्वच कार्यकर्ते गणिततज्ञ व्हायला लागलेत.
#कितीचं_लिड
हा मेसेज सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतोय. हा मेसेज फक्त कोल्हापूर आणि हातकणंगलेचा असेल तरी प्रत्येक जण आपल्या मतदारसंघाचं नाव टाकून मेसेज पुढे ढकलत आहे. कोणत्या मतदारसंघातून आणि कोणत्या गावातून कितीचं लीड मिळेल याचाही अंदाज कार्यकर्ते बांधत आहेत.
निवडणुकांच्या काळात आपला पक्ष आणि आपला उमेदवार एवढीच चर्चा असते. निवडणुकीपूर्वी कोणत्या भागातून किती मतदान मिळू शकेल हे आणि निवडणुकीनंतर कुठून किती लीड मिळेल याचा अंदाज कार्यकर्ते बांधत असतात. पण निकालासाठी 25 दिवस बाकी असल्याने कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे काही जण गणिततज्ञ होण्याच्या अगोदर निकाल लावा असे मेसेज व्हायरल होत आहेत.
सर्वाधिक चर्चा असलेले मतदारसंघ
कोल्हापूर आणि हातकणंगले
कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँटे की टक्कर आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होत आहे. कोल्हापुरात मतदान झाल्यापासून कुणाला किती लीड मिळणार या चर्चेने कार्यकर्त्यांमध्ये रंगत वाढली आहे. हीच परिस्थिती हातकणंगले मतदारसंघात आहे. शिवसेनेकडून धैर्यशील माने आणि आघाडीकडून राजू शेट्टी उभे आहेत.
बीड
या मतदारसंघात तर जातीनिहाय समीकरणं जुळवली जात आहेत. आपल्या उमेदवाराची ही जात आहे म्हणून या भागातून एवडं लीड मिळेल, असा अंदाज बांधण्यात कार्यकर्ते व्यस्त आहेत. तर उत्साही कार्यकर्त्यांकडून विविध पत्रकार आणि चॅनलच्या नावाने खोटो सर्व्हेही व्हायरल केले जात आहेत. मतदानाच्या काळात कोणताही सर्व्हे जारी करण्यावर बंदी असते. पण मतदान झाल्यापासून बीड जिल्ह्यात बनावट सर्व्हेंचा धुमाकूळ सुरु आहे.
बारामती आणि मावळ
पवार कुटुंबासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या दोन्ही मतदारसंघात उमेदवारांपेक्षा कार्यकर्तेच तणावात असल्याचं दिसतंय. कारण, कोणत्या गावातून किती लीड मिळेल यापासून अंदाज बांधला जातोय. मावळमध्ये रायगड जिल्ह्यातील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील मतदान राष्ट्रवादीच्याच बाजूने कसं होईल हे कार्यकर्ते पटवून देत आहेत, तर त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनही उत्तर दिलं जातंय.