मुंबई | 15 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदारांच्या सुनावणीवर निकाल देताना निवडणूक आयोगाने दिलेल्या पुराव्याचा आधार घेतला. शिंदे गटाचे आमदार अपात्र नाहीत असा निर्णय देतानाच त्यांनी ठाकरे गटाचे आमदारही पत्र ठरविले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या याच निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी वरळी येथे जनता न्यायालयाचे आयोजन केले होते. उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालयात निवडणूक आयोगाला दिलेले पुरावे, त्याची पोचपावती आणि काही व्हिडीओ दाखविले. ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेत्यांनी ठाकरे यांची खिल्ली उडविली.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी सोशल माध्यम x वर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे मागितले. जे अयोध्येत राम मंदिर उभे राहणार का? याच्याही तारखा आणि पुरावे मागत होते. आज त्यांना बघा, आपल्याच अस्तित्वाचे पुरावे घेऊन दारोदारी फिरायची वेळ आली अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
देवाचे अस्तित्वच नाकारणारे ज्यांना अतिप्रिय वाटू लागलेत. राम काल्पनिक आहे. राम सेतू काल्पनिक आहे, असे म्हणणाऱ्या काँग्रेससोबत संगत करुन प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रभू रामाच्याच अस्तित्वाचे पुरावेच जे मागू लागले होते, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे. राम नाम ही परम सत्य है। बाकी सभी यहाँ व्यर्थ है। जय श्रीराम!! असे आशिष शेलार म्हणाले आहेत.
दरम्यान, अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाच्या वतीने श्रीराम आनंद सोहळ्याच्या माध्यमातून भव्य गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली. महाराष्ट्राचे श्रेष्ठ कवी गदिमा यांचे शब्द, बाबुजी अर्थात सुधीर फडके यांचं अद्वितीय संगीत आणि मधूर आवाज असलेली गाणी नामांकित गायकांकडून ऐकण्याची सुवर्णसंधी मुंबईकराना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत २० ते २३ जानेवारी या कालावधीत चार ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय प्रत्येक विभागात महाआरती, देवळांची साफसफाई, रोषणाई, विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले.