जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत ए. टी. पाटील पुन्हा सक्रिय, ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार

| Updated on: Oct 18, 2021 | 1:35 PM

भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. पाटील हे भाजपकडून उमेदवारी करणार आहेत.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत ए. टी. पाटील पुन्हा सक्रिय, ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार
भाजप नेते ए. टी. पाटील, जळगाव जिल्हा बँक
Follow us on

जळगाव : पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा बळी ठरलेले जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. पाटील हे भाजपकडून उमेदवारी करणार आहेत. त्यामुळे आता जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या भूमिकेची चर्चा चांगलीच रंगली आहे. दुसरीकडे जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलमधून काँग्रेसनं काढता पाय घेतल्यानं आता भाजपनंही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. (Jalgaon District Bank elections, former BJP MP A. T. Patil active in Politics)

2019 मध्ये भाजपने कापले होते तिकीट

ए. टी. पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे सलग दोन टर्म प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, 2019 मध्ये पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे त्यांची उमेदवारी पक्षाने कापली होती. याच कारणामुळे पाटील हे गेल्या 3 वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दुरावलेले होते. भाजपच्या व्यासपीठावर ते कुठेही दिसले नव्हते. मात्र, आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते प्रकाशझोतात आले आहेत. विशेष म्हणजे, ते भाजपकडून उमेदवारी करत आहेत.

ए. टी. पाटील बँकेचे विद्यमान संचालक

माजी खासदार ए. टी. पाटील हे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आहेत. मागच्या संचालक मंडळात ते भाजपकडून ओबीसी मतदारसंघातून जिल्हा बँकेवर निवडून आले होते. आताही ते भाजपकडून ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तशी माहिती त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना दिली. मी भाजपत सक्रिय आहे. पक्षाचे काम करत असून, पक्षापासून दुरावलेलो नाही, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

जळगावमध्ये एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे?

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते. मात्र काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. काँग्रेसच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीनेदेखील भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला आहे. तशी माहिती भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. या निर्णयामुळे आता राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे विरुद्ध भाजपच्या रक्षा खडसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तसेच दुकरीकडे काँग्रेसनेसुद्धा स्वबळाचा नारा दिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

काँग्रेसचा भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार

याआधी अजिंठा विश्रामगृहावर 16 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादी नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादी नेते तथा माजी आमदार सतीष पाटील, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आदी नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत  काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता.  काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका मांडली होती.

इतर बातम्या :

‘दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही’, अतुल भातखळकरांचा शरद पवारांना टोला

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर, वळसे-पाटीलही पोहोचले; चर्चा नेमकी कशावर?

Jalgaon District Bank elections, former BJP MP A. T. Patil active in Politics